एपी, मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या कायदे मंडळात काचेच्या पेटीत दोन जीवाश्म अवशेष सादर करण्यात आले. पत्रकार आणि स्वयंघोषित यूएफओ शास्त्रज्ञ जेमे मॉसन यांनी सादर केलेले हे जीवाश्म एक हजार वर्षे जुने असल्याचे सांगण्यात आले. हे जीवाश्म मानवी नसून एलियन असल्याचे मॉसन यांचे म्हणणे आहे. त्यावर मेक्सिको कायदे मंडळात चर्चा करण्यात आली.

मात्र, हे जीवाश्म एलियनचे असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी फेटाळला आणि हा फसवणुकीचा प्रकार असल्याचा आरोप केला. मॉसेन यांनी सादर केलेले अवशेष पेरूमधील कुस्को येथे सापडले असून ते एक हजार वर्षे जुने असल्याचे सांगण्यात आले. या प्रजाती आपल्या जगातील (पृथ्वीवरील) उत्क्रांतीचा भाग नाहीत, ते यूएफओच्या भंगारातून सापडलेले नाहीत, तर ते डायटम मॉस खाणीमध्ये जीवाश्माच्या रूपात सापडले असे त्यांनी पार्लमेंटमध्ये शपथेवर सांगितले. या जीवाश्मांची डीएनए चाचणी केली आणि त्यामध्ये या जगातील जीवांप्रमाणे काहीही आढळले नाही तर आपण ते तसे स्वीकारायला हवे असे मॉसेन यांनी कायदे मंडळात सांगितले. 

नासाचा यूएफओ अहवाल जारी

नासाने गुरुवारी यूएफओ अभ्यासाचा अहवाल जारी केला. यूएफओ अभ्यासासाठी अधिक प्रगत उपग्रह आणि उडणाऱ्या अज्ञात वस्तूंकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल यासह नवीन वैज्ञानिक तंत्राची गरज असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. यूएफओंचा एक वर्ष अभ्यास केल्यानंतर हा ३३ पानी अहवाल प्रसृत करण्यात आला. या अभ्यासासाठी नासाने एक स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली होती. यूएफओविषयी नकारात्मक दृष्टिकोन हा डेटा संकलित करण्यातील अडथळा असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Story img Loader