परग्रहावरील माणसे म्हणजे एलियन्सबद्दल मानवी बुद्धीला प्रचंड कुतूहल आहे. खरोखरच एलियन्सचे अस्तित्व आहे का ? ते पृथ्वीवर कधी येतात का ? आपल्यापेक्षा ते किती प्रगत असतील ? असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. अद्यापपर्यंत या प्रश्नांना ठोस उत्तर मिळाले नव्हते. पण आता खुद्द नासाच्या एका शास्त्रज्ञाने एलियन्स म्हणजे परग्रहावरच्या माणसाच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे.
कदाचित एलियन्स पृथ्वीवर येऊन गेले असतील पण ते आपल्याला समजले नसेल असे नासाच्या रिसर्च सेंटरमधील संगणक वैज्ञानिक सिल्वानो.पी.कोलंबो यांनी आपल्या संशोधन अहवालात म्हटले आहे. मानवाची एलियन्सबद्दलची जी कल्पना, धारणा आहे त्यापेक्षा एलियन्स हे पूर्णपणे वेगळे दिसत असावेत. एलियन्सची संरचना परंपरागत कार्बन संरचनेवर आधारीत नसल्यामुळे आपल्याले ते येऊन गेल्याचे कळले नसेल असे वैज्ञानिक आणि प्राध्यापक असलेल्या सिल्वानो यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.
आपण ज्यांना शोधतोय किंवा जे आपल्याला शोधतायत ते कार्बन आधारीतच असले पाहिजे हे आवश्यक नाही असे सिल्वानो यांनी अहवालात म्हटले आहे. एलियन्सबद्दल आपल्या ज्या धारणा आहेत त्यावर आपल्या पुन्हा नव्याने काम करण्याची गरज आहे असे सिल्वानो यांचे मत आहे. एलियन्स आपल्यापेक्षा जास्त हुशार असू शकतात ते आकाराने अतिस्क्षूमही असतील असे सिल्वानो यांचे म्हणणे आहे.
परग्रहावरील माणसे म्हणजे एलियन्स अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग आहे. गेल्या काही काळात त्यांना पाहिले गेल्याचे दावेही अनेकांनी केले आहेत. इंटरनेटवर तर अशी कितीतरी माहिती उपलब्ध आहे. चीनमध्ये एलियन्सच्या अस्तित्वावर मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. त्यासाठी चीनने एक रेडिओ टेलिस्कोपही विकसित केला आहे.