२००८ मध्ये टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथनची हत्या करण्यात आली. त्या प्रकरणी आता साकेत कोर्टाने पाचही आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. रवि कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी यांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी आता पुढची सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे. या दिवशी पाचही आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. सगळ्या दोषींना मकोका अंतर्गत हत्या आणि लूट गुन्हे नोंदवत दोषी ठरवण्यात आलं आहे.
१५ वर्षांपूर्वी पत्रकार सौम्या विश्वनाथनची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सौम्या विश्वनाथनला ३० सप्टेंबर २००८ च्या दिवशी पहाटे ३.३० ला हत्या करण्यात आली. ती आपल्या कारने घरी परतत होती. त्याचवेळी तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि तिला ठार करण्यात आलं. पोलिसांनी हा दावा केला की तिची हत्या लुटीच्या उद्देशाने झाली होती. या हत्या प्रकरणात रवि कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी यांना अटक करण्यात आली. २००९ पासून हे सगळे तुरुंगात आहेत. पोलिसांनी सगळ्या आरोपींवर मकोका लावला आहे.
पोलिसांना सौम्या विश्वनाथन प्रकरणातला महत्त्वाचा पुरावा तेव्हा मिळाला जेव्हा पोलीस जिगिशा घोषच्या हत्या प्रकरणी तपास करत होते. चौकशी दरम्यान पोलिसांना हे समजलं की वसंत विहार या ठिकाणी जे हत्याकांड झालं त्या या हत्येचे धागेदोरे मिळतेजुळते आहेत. २००९ मध्ये ६२० पानांचं चार्जशीट दाखल केलं. दोन्ही हत्यांमागे लुटीचा उद्देश असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी सांगितलं की पाचही आरोपींवर हत्या, पुरावे नष्ट करणं, कट रचणं हे गुन्हे दाखल आहेत.