All India Pregnant Job Service Scam in Bihar : सायबर घोट्याळ्याचे अनेक प्रकार आपण आजवर पाहिले आहेत. बँकेतून बोलतोय असं सांगून तुमच्या खात्यातून परस्पर पैसे वजा करण्यापासून ते तुमचा अमुक नातेवाईक अडचणीत असून त्याच्या मदतीसाठी पैसे हवेत असं सांगणारा फोनकॉल असो. भामट्यांनी फसवणुकीचे असंख्य प्रकार शोधून काढले आहेत. बिहारमध्ये तर यापेक्षाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस नावाचा. या घोटाळ्यात गरीब, कष्टकरी कामगार आणि शेतकऱ्यांना पैशांचं आमिष दाखवलं जातं अन् त्यांच्याकडूनच पैसे उकळले जातात. या घोटाळ्याचा गेल्यावर्षीच पर्दाफाश झाला आहे. परंतु, तरीही हा घोटाळा थांबलेला नाही. पैशांच्या आमिषाने घोटाळ्याला बळी पडण्याऱ्यांची संख्या वाढत जाते, पण घरसंसार उघड्यावर येईल या भीतीने कोणीही पोलीस तक्रार करायला धजावत नाही.
बिहारच्या नवादा जिल्ह्यात हा घोटाळा चालतो. याबाबत दि प्रिंटने काही पीडितांशी संवाद साधून या घोटाळ्याबाबत अधिक माहिती घेतली. या घोटाळ्याची जाहिरात फेसबूक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर केली जाते. महिलांना गरोदर करा आणि पैसे मिळवा अशी ही योजना असून असंख्य गरीब तरुण या योजनेला बळी पडतात. “माझी पत्नी सात महिन्यांची गरोदर होती. या काळात पैशांची सोय व्हावी म्हणून मी या योजनेकडे आकर्षित झालो. पण माझेच पैसे गेले. आता स्कॅमविरोधातील असलेली कॉलर ट्युन ऐकली तरी माझा पारा चढतो”, असं मुकेश कुमार नावाच्या पीडिताने दि प्रिंटला सांगितलं.
हायफाय ऑफिस नव्हे तर शेतातून उभारलं जाळं
या घोटाळ्यासाठी मोठालं ऑफिस नाही की फर्निचर नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले बेरोजगार अल्पवयीन मुलं ज्यांना तंत्रज्ञानाची जाण आहे अशांनी हा फसवणुकीचा व्यवसाय सुरू केला आहे. नवादा जिल्ह्यातील चकवाई, सिमरी आणि समई गावातील शेड, शेते आणि फळबागांमध्ये हा व्यवसाय चालतो. तसंच, या घोटाळ्यासाठी ते स्वस्त चिनी मोबाईल फोन वापरत आहेत.
याबाबत नवादा येथील सायबर पोलीस ठाण्याच्या प्रमुख डीएसपी प्रिया ज्योती म्हणाल्या, “या प्रकरणात आम्ही २०२४ मध्ये आठ जणांना अटक केली होती. २०२५ मध्ये आणखी तिघांना अटक करण्यात आली. पण यांचं जाळं समुद्रासारखं विस्तारलेलं आहे. तुम्ही अशा विचित्र प्रकरणांमध्ये १०० लोकांना अटक करू शकता आणि तरीही या घोटाळ्याच्या नावाचा वापर करून पैसे उकळणारा १०१ वा व्यक्ती तुम्हाला सापडलेच.”
जानेवारीत तिघांना अटक
५ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास डीएसपी ज्योती यांच्या पथकाने सहा पोलीस तीन दुचाकीवरून नवादातील कुहाआरा गावात गेले. जेमतेम ८ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब आणि प्लेबॉय सर्व्हिस करणाऱ्या लोकांच्या एका गटाची माहिती नवादा सायबर पोलिसांना मिळाली होती. साध्या वेशात गेलेल्या पोलिसांना या गुन्हेगारांनी लागलीच ओळखलं, त्यामुळे तेथील चार तरुण शेतातून पळून गेले. पोलीसही त्यांच्या मागून पळत गेले. पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवल्यानंतर तीन जणांना अटक करण्यात आली. यापैकी एकजण १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा होता. त्याच्याकडे विवो आणि रेडमीसारख्या चिनी कंपन्यांचे सहा स्वस्त मोबाईल फोन, जॉब कार्ड आणि महिलांचे फोटो होते.
हा एक असाधारण घोटाळा आहे. महिलेला गरोदर बनवून तुम्हाला कोणी दहा लाख रुपये देऊ शकतं असा कोणी विचार तरी करेल का? असं उपनिरिक्षक नीलेश कुमार सिंह म्हणाले. याप्रकरणात गरीब शेतकरी, मजूर आण रोजंदारीवर काम करणारे तरुण बळी पडतात. इथे लाखो रुपयांचं आमिष दाखवलं जात नसलं तरीही मोठ्या प्रमाणात बळी पडणाऱ्यांचं प्रमाण असल्याने फसवणूक करण्याऱ्यांचं फावतं. या प्रकरणात बळी पडणारे संसार मोडेल या भीतीने पोलिसांपर्यंतही जात नाहीत.
मुन्ना कुमार हा या घोटाळ्याचा मास्टरमाईंड आहे. त्याला गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली. त्याने नवादा येथील गुरमाह येथील कालव्याजवळील एका छोट्या झोपडीतून या व्यवसायाला सुरुवात केली. यामध्ये त्याला मदत करायला त्याने २५ तरुणांना कामावर ठेवलं. ते मासेमारी करत असल्याचं त्यांनी गावकऱ्यांना भासवलं. “ते लोकांची फसवणूक करत आहेत, असा आम्हाला कधीच संशय आला नाही”, असं गावचे सरपंच नरेश साव यांनी दि प्रिंटला सांगितलं.
नेटवर्क कसं उभारलं?
मुन्नाकडे बनावट सिम कार्ड आणि स्वस्त मोबाईल फोन होते. यामाध्यमातून त्याने तरुणांना प्रशिक्षण दिलं. नेटवर्क आण कॉल करण्यासाठी त्याने कालव्यांजवळ वॉचटॉवर उभारले. “अशा घोटाळ्याबाबत पहिल्यांदा ऐकलं तेव्हा आम्ही पोट दुखेपर्यंत हसलो होतो. ही कल्पना अत्यंत सृर्जनशील होती”, असं सिंग म्हणाले.
“मी एक अशिक्षित व्यक्ती आहे. जेव्हा मला एका फेसबूक पोस्टवर एका तरुणीचा फोटो दिसला, त्यावर मला कॉल करा असं लिहिलं होतं. त्यावर मी लागलीच फोन केला होता. त्यांनी आधी मला ५०० रुपेय नोंदणी शुल्क भरायला सांगितले. त्यानंतर सुरक्षा ठेव म्हणून ५५०० रुपये भरण्यास सांगितले. पण माझ्याकडे पैसे नाहीत असं सांगितल्यावर त्यांनी माझ्याकडे जितके पैसे आहेत, तितके भरण्यास सांगितले. मला वाटलं त्यांच्याकडून पुन्हा पैसे परत येतीलच. पण माझे पैसे परत आले नाहीत. तसंच, मला कोणत्याही महिलेला भेटायला दिलं नाही. मी त्यांच्या फोनची वाट पाहत राहिलो”, अशी प्रतिक्रिया पाटणा येथील बिरेंद्र ठाकूर यांनी दिली. त्यांनी ज्या महिलांचे फोटो दाखवले त्या हाय प्रोफाईल नव्हत्या, सामान्य घरातील महिलांचे फोटो त्यांनी दाखवले होते. त्यामुळे लोकांना या योजनेवर लगेच विश्वास बसतो, असंही त्याने पुढे स्पष्ट केलं.