पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांमध्ये भारतीयांचा समावेश नाही. फ्रान्समध्ये सर्व भारतीय सुखरूप आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज दिली.
फ्रान्समधील हल्ल्यानंतर टिवटरवर स्वराज यांनी म्हटले, की फ्रान्सच्या भारतीय दूतावासाशी मी बोलले आहे. तेथील सर्व भारतीय सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. फ्रान्सने नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.याआधी फ्रान्समधील भारतीय दूतावासातील अधिकारी मनीष प्रभात यांनी या हल्ल्यातील मृतांमध्ये भारतीय नागरिकाचा समावेश नसल्याचे स्पष्ट केले होते. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही हेल्पलाइन सुरू केली. त्यावर अनेक फोन आले. तसेच येथील भारतीयांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येत असल्याचे प्रभात यांनी सांगितले.
सर्वात भीषण हल्ला
बंदूकधारी आणि स्फोटके बाळगलेल्या आत्मघातकी हल्लेखोरांनी पॅरिसमधील सहा ठिकाणी हल्ले करताना संपूर्ण फ्रान्सला हादरवून सोडले. पश्चिम युरोपमध्ये या दशकात झालेला हा सर्वात भीषण हल्ला ठरला आहे. हल्लेखोरांनी पॅरिसमधील उपाहारगृहे, कॉन्सर्ट हॉल आणि राष्ट्रीय स्टेडियम यांना लक्ष्य केले आहे. ली बॅटाक्लान येथील कॉन्सर्ट हॉलमध्ये कॅलिफोर्नियाच्या बॅण्डचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यानंतर इतर ठिकाणीही अशाच प्रकारे हल्ले करण्यात आले.