धर्मनिरपेक्षता का काय म्हणतात ते केवळ बोलण्यापुरते असते. दोन्ही हात वर करून तावातावाने-त्वेषाने आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत; सर्वधर्मसमभाव मानणारे आहोत, असं बोललं की टाळ्या पडल्याच म्हणून समजा! कुठल्याही जातीचा-धर्माचा-रंगाचा राजकीय पक्ष असू द्या; एकच ठिकाणी सर्वपक्षसमभाव मानला जातो. देशातील कुठल्याही वस्तीत (दिल्लीकरांच्या भाषेत झुग्गी-झोपडी) गेल्यावर सर्वपक्षसमभावाची एक ‘विलक्षण’ अनुभूती येते. दिल्लीची सीलमपूर वस्तीदेखील याच गटात मोडणारी. म्हणायला काँग्रेसचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यात गेल्या दहा वर्षांत काँग्रेसने विकासाची गंगा आणली (हा दावा काँग्रेसचे नेतेच करतात). ही गंगा टँकरद्वारे आली म्हणा! टँकरद्वारे विकासाची गंगा झोपडपट्टीत काँग्रेसने आणली व महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने या गंगेत टँकरची वाढीव भर टाकली. भारतात कुठेही गेलात तरी वस्ती बदलत नाही. ‘झोपु’ योजना जणू काही झोपेत राबवल्याचा अनुभव प्रत्येक वस्तीत येतो. दिल्लीत सध्या निवडणूक प्रचाराला जायचे असल्यास खाऊनपिऊन पाचशे रुपये मिळतात. तसे कमीच आहेत. पण वस्तीत राहणाऱ्यांना निवडणूक म्हणजे धंद्याचा काळ असतो. तर सीलमपूरविषयी. ही वस्ती दिल्लीभर बदनाम आहे. म्हणजे दिवसाढवळ्या पाकीट मारले जाईल अशी वस्ती. ही वस्ती म्हणजे विटांच्या हजारेक झोपडय़ांभोवती उंचच उंच भिंतीची तटबंदी. खेटून असलेल्या भिंती व एकावर एक मजले. गल्लीबोळातून वळताना प्रत्येक वळण सारखे वाटेल. एकाच गल्लीत किमान दहा राजकीय पक्षांचे झेंडे. काँग्रेस, भाजप, बसप, आप यांखालोखाल कुठल्याशा बहुजन मुक्ती पार्टी, अवामी कौम पक्षाचे झेंडे घराघरांवर दिसतात. या वस्तीत प्रत्येक पक्षाचे नेते प्रचाराला येतात. हा आपला परंपरागत मतदार म्हणून काँग्रेसचे लक्ष व हा मतदार आपल्याकडे येऊ शकतो म्हणून आम आदमी पक्षाचे या वस्तीवर लक्ष असते. भाजपचे लोक अधूनमधून डोकावतात. एका गल्लीत मशीद, तर दुसऱ्या गल्लीत शंकराचे मंदिर. दोन्ही प्रार्थनास्थळांच्या भिंतीवर एका शेजारी एक असे सर्वपक्षीय पोस्टर्स असतात. अशी पक्षनिरपेक्षता कुठेही दिसत नाही. रात्री उशिरापर्यंत निवडणुकीचा ‘प्रचार’ सुरू असतो. गोंधळ असला तरी तिथे राहणाऱ्यांना त्याचा त्रास होत नाही. कारण त्यांची मानसिकताच वर्षांनुवर्षे तशी करून ठेवली आहे. मतदानापूर्वी घराघरात टीव्ही संच पोहोचवण्याची व्यवस्था करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी विजेचे दर त्यांना परवडणार नाहीत असे करून ठेवले. सांडपाण्याची व्यवस्था नाही, गलिच्छपणाचा कळस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ भारताची ‘मन की बात’ या वस्तीत पोहोचलेली नसते. कुणीही यावे, आश्वासन द्यावे, मत मिळवावे, पाच वर्षे सत्ता उपभोगून नव्याने जुनीच आश्वासने घेऊन पुन्हा मत मागावे.  दिल्ली त्याला अपवाद नाही. निवडणूक म्हटली की केवळ आश्वासनं. तरीही प्रत्येक वस्ती कुणाचाही राग न धरता सर्वाचे झेंडे मिरवत सर्वपक्षसमभाव जपत असते. अर्थात झेंडे कुणाचेही असले तरी मतदान करताना कोणत्या पक्षाचा ‘हात’ धरावा, हे सांगावे लागत नाही.
-चाटवाला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा