तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्राने बोलावलेल्या बैठकीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्वपक्षीय नेत्यांना अफगाणिस्तानात केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कारवाई, बचाव मोहीम यासंबंधी सविस्तर माहिती देणार आहेत.
एस जयशंकर हे या बैठकीदरम्यान भारतामार्फत अफगाणिस्तानात सुरू असलेल्या बचाव मोहिमेबद्दल माहिती देतील. किती भारतीय परतले आहेत? आणखी किती जणांना अजूनही बाहेर काढायचे आहे?अफगाणी मित्र आणि अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना बाहेर काढणं, तालिबानशी संबंध आणि गुंतवणूकीची सुरक्षा याविषयी देखील या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Delhi | External Affairs Minister Dr S Jaishankar briefs all-party panel over the present situation in Afghanistan. pic.twitter.com/8SvKaeiGii
— ANI (@ANI) August 26, 2021
शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित
गेल्या आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर केंद्र सरकारने एस जयशंकर यांना सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना याबाबतची माहिती देण्यास सांगितल्यानंतर ही प्रमुख बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. थोड्याच वेळापूर्वी केंद्राच्या या सर्वपक्षीय बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे देखील संसदेत दाखल झाले होते. याचसोबत एचडी देवेगौडा आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा देखील या प्रमुख बैठकीला उपस्थित राहण्यासाठी संसद भवनात दाखल झाले आहेत.
‘या’ विषयावर सर्वपक्षीय एकजूट राहावी ही राष्ट्रवादीची भूमिका!
“अफगाणिस्तान विषयावर सर्व पक्षीय एकजूट राहिली पाहिजे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे”, अशी माहिती राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.
अफगाणिस्तान विषयावर सर्वपक्षीय एकजूट राहिली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका- नवाब मलिकhttps://t.co/2jrmCKNbWi #Afghanistan #AfghanistanCrisis #India #NCP @nawabmalikncp @NCPspeaks pic.twitter.com/I0dWmjlJJu
— LoksattaLive (@LoksattaLive) August 26, 2021
अफगाणिस्तानमधील परिस्थितीत भारताने १६ ऑगस्ट रोजी आपल्या स्थलांतर आणि बचाव मोहिमेला सुरुवात केली असून आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त जणांना देशात आणलं आहे. ह्यात अनेक अफगाणिस्तान शीख आणि हिंदूंचा देखील समावेश असल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंसंस्थेने दिली आहे.