ज्ञानवापी मशिदीनंतर आता मथुरेतल्या शाही ईदगाह मशिदीचं वैज्ञानिक सर्वेक्षण केलं जाणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने यासंदर्भात आज (१४ डिसेंबर) महत्त्वाचा निकाल दिला. शाही ईदगाह मशीद ही कृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आलेली आहे असा दावा करत हिंदू संघटनांनी या मशीद परिसराचं वैज्ञानिक सर्वेक्षण करून सत्य सर्वांसमोर आणावं अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मथुरा न्यायालयाने याप्रकरणी सर्वेक्षणास परवानगी दिल्यानंतर मुस्लीम पक्षकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आज उच्च न्यायालयानेही मशीद परिसराचं वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली आहे.

हे वाचा >> कृष्ण जन्मभूमी खटल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, मथुरेतल्या शाही ईदगाह मशिदीचं ASI सर्वेक्षण होणार

अलाहाबाद उच्च न्यायालय मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणासाठी विशेष आयुक्तांची नियुक्ती करणार आहे. तसेच या सर्वेक्षणात किती लोक सहभागी होतील? सर्वेक्षण कधी सुरू केलं जाईल? मशीद परिसरातील कोणकोणत्या भागांचं सर्वेक्षण केलं जाईल? याबाबतचा निर्णय १८ डिसेंबर रोजी घेतला जाईल. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या खटल्यावर भाष्य करताना म्हटलं आहे की, काही लोकांनी कायदा आणि सुव्यवस्थेची थट्टा चालवली आहे.

खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, अलाहाबाद उच्च न्यायालयाने शाही ईदगाह मशिदीचं सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली आहे. बाबरी मशीद खटल्याचा निकाल लागला तेव्हा मी म्हणालो होतो की संघ परिवाराच्या (आरएसएस) कुरापती वाढतील. मथुरेतला विवाद अनेक दशकांपूर्वी मशीद समिती आणि मंदिर ट्रस्टने आपसात सोडवला होता. काशी, मथुरा किंवा लखनौ कुठल्याही मशिदीचा विषय असेल तर तुम्ही मंदिर ट्रस्ट आणि मशीद समितीने केलेला करारा वाचावा. परंतु, हल्ली नवनवे वाद उकरून काढले जात आहेत.

हे ही वाचा >> मथुरा कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा यूपीच्या राजकारणात बदल घडवू शकतो? राम मंदिरानंतरचा अजेंडा काय?

देशात प्रार्थनास्थळ अधिनियम (प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट) अद्याप अस्तित्वात आहे. परंतु, या लोकांनी (सत्ताधारी) कायदा आणि सुव्यवस्थेची थट्टा चालवली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी ९ जानेवारी रोजी सुनावणी घेणार होतं. मग अचानक कसली घाई होती की आत्ताच सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या देशात सातत्याने मुस्लीम समुदायाला लक्ष्य केलं जात आहे. कृपया कोणीही आम्हाला गिव्ह अँड टेकचे (देवाण-घेवाण) उपदेश देऊ नये. हे लोक (भाजपा) कायदा मानत नाहीत. केवळ मुस्लिमांच्या प्रतिष्ठेला नख लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Live Updates