Sambhal Jama Masjid: उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीवरून अजूनही वाद सुरू आहे. हिंदू पक्षाचा असा दावा आहे की, तिथे पूर्वी हरिहर मंदिर होते जे पाडून मशीद बांधण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात बऱ्याच काळापासून सुरू आहे, उच्च न्यायालयात यावर अनेकवेळा वादविवाद झाले आहेत. आता, दरम्यान, उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान, जामा मशिदीचा उल्लेख वादग्रस्त रचना म्हणून करण्यात आला आहे.
मशिदीबद्दल उच्च न्यायालयाने काय म्हटले?
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती रोहित रंजन यांनी जामा मशिदीचा ‘वादग्रस्त रचना’ म्हणून उल्लेख केला आहे. दरम्यान हिंदू पक्ष सतत जामा मशिद वादग्रस्त रचना असल्याचे म्हणत आहे, पण ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान मशिद वादग्रस्त रचना आहे असे म्हटले आहे. न्यायमूर्तींच्या या उल्लेखामुळे हिंदू पक्षामध्ये उत्साहाचा वातावरण आहे, तर दुसरीकडे मुस्लिम पक्षाला मात्र यामुळे धक्का बसला आहे.
यापूर्वी जामा मशिदीत रंगकाम करण्यास परवानगी मागितल्यानंतरही मुस्लिम पक्षाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने झटका दिला होता. त्या मागणीबाबत, उच्च न्यायालयाने एएसआयला अहवाल तयार करण्यास सांगितले होते. त्यानंतर न्यायालयाने तीन सदस्यांचे एक पथक तयार केले होते, ज्यामध्ये प्रशासनाचा एक सदस्य आणि एक एएसआय अधिकारी यांचा समावेश होता. काही तासांच्या सर्वेक्षणानंतर, एएसआयने आपला अहवाल सादर केला ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या होत्या.
मशिदीत आढळले अनेक बदल
एएसआयने आपल्या अहवालात म्हटले आहे की, सध्या रंगकामाची गरज नाही, आता त्याच अहवालाच्या आधारे न्यायालयानेही रंगकामासाठी परवानगी नाकारली. त्याच अहवालात मशिदीत काही बदल देखील झाल्याचे सूचित करण्यात आले होते.
अहवालातच असे नमूद करण्यात आले आहे की, मशिदीत अनेक बदल दिसून आले आहेत. मशिदीच्या फरशीवरील टाइल्स आणि दगडांमध्ये बदल दिसून आले आहेत. याशिवाय, मशिदीच्या अनेक भागांमध्ये सोनेरी, लाल, हिरवा आणि पिवळा रंगांचा जाड इनॅमल रंग देखील देण्यात आला आहे. या रंगाद्वारे मूळ पृष्ठभाग झाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
हिंसाचारात चौघांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील संभल येथे गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी शाही जामा मशिदीच्या न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेकजण जखमी झाले होते. यानंतर देशभरात वातावरण तापले होते.