श्रीकृष्ण जन्मभूमी वादासंदर्भातील याचिकेवरील पुढील सुनावणी आता ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यांतर्फे मुळ याचिकेत बदल करण्याची मागणी केल्याचे अलाहबाद उच्च न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. बुधवारी याप्रकरणी सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांनी यासंदर्भात माहिती दिली.

मथुरेतली शाही ईदगाह मशीद ही कृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आली आहे, असा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयात जवळपास १८ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिका एकत्रित करून त्यावर सुनावणी होईल, असं न्यायालयाकडून आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे.

हेही वाचा – इदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यास उच्च न्यायालयाची मान्यता; श्रीकृष्ण जन्मभूमी वाद काय आहे?

महत्त्वाचे म्हणजे आज झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी या प्रकरणाची सुनावणी रोज घेण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. याप्रकरणी रोज सुनावणी घेता येईल, अशी व्यवस्था सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे ही मागणी मान्य करता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. दरम्यान, गेल्या १ ऑगस्ट रोजी या प्रकरणावर सुनावणी पार पडली होती. त्यावेळी न्यायालयाने या याचिकांबाबत मुस्लीम पक्षकारांनी केलेले दावे फेटाळून लावले होते.

याचिकाकर्त्यांची मागणी काय?

हिंदू पक्षाने दाखल केलेल्या याचिकेत उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड, तसेच शाही इदगाह मशीद समिती यांना जमिनीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेले बांधकाम हटवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केलेली आहे. अतिक्रमण केलेली ही जागा श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टकडे सुपूर्द करण्याचा आदेश उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड, तसेच शाही इदगाह मशीद समिती या दोघांनाही द्यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे. तसेच वक्फ बोर्ड व शाही इदगाह मशीद समिती, तसेच या दोन्ही संस्थांशी निगडित असलेल्या लोकांना मथुरा जिल्ह्यातील कटरा केशव देव शहरात असलेल्या १३.३७ एकर परिसरात प्रवेश करू देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

“औरंगजेबाने भारतावर राज्य केले ही एक वस्तुस्थिती आणि ऐतिहासिक बाब आहे. औरंगजेबाने अनेक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला होता. त्यात मथुरेतील कटरा केशव देव येथील श्रीकृष्णाचे जन्मस्थळ असलेले मंदिरही १६६९-७० मध्ये उद्ध्वस्त करण्यात आले. औरंगजेबाचे सैन्य केशव देव मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकले नाही. त्यानंतर या ठिकाणी एक बांधकाम करण्यात आले. त्याला आज इदगाह मशीद म्हणून ओळखले जाते,” असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – कृष्ण जन्मभूमी खटल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, मथुरेतल्या शाही ईदगाह मशिदीचं ASI सर्वेक्षण होणार

मुस्लीम पक्षाचे मत काय?

मुस्लीम पक्षकाराने मात्र हिंदू पक्षाने केलेले दावे फेटाळले आहेत. उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि शाही इदगाह मशीद समितीच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना “शाही इदगाह मशीद ही कटरा केशव देव येथील १३.३७ एकर जमिनीच्या परिसरात येत नाही. मशिदीच्या खाली भगवान कृष्णाचे जन्मस्थळ नाही. हिंदू पक्षाकडून केल्या जाणाऱ्या दाव्याला कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. तसेच हा दावा फक्त अंदाजावार आधारलेला आहे,” असा युक्तिवाद केला.