पीटीआय, लंडन : ब्रिटनचे उपपंतप्रधान डॉमिनिक राब यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. त्यांच्यावर निरनिराळय़ा खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप होता. अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी राब हे आपल्यावर दादागिरी करतात असा आरोप केला होता. चौकशीअंती त्याचा अहवाल पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडे गुरुवारी सादर करण्यात आला. त्यानंतर राब यांनी राजीनामा दिला, त्यांचा राजीनामा स्वीकारताना सुनक यांनी दु:ख व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राब हे सुनक यांचे निकटवर्तीय आहेत, त्यामुळे या घडामोडींमुळे त्यांना धक्का बसला आहे.  डॉमिनिक राब न्यायमंत्री असताना सरकारी अधिकाऱ्यांना धाकदपटशा दाखवत असत, त्याबरोबरच त्यांच्याशी अपमानास्पद वर्तन करत असत असे तपासामध्ये आढळून आले.  बैठकांमध्ये बोलताना त्यांनी सरकारी कामाचा उल्लेख ‘अतिशय निरुपयोगी’ आणि ‘त्रासदायक’ असा केला होता. त्याशिवाय परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून कर्मचाऱ्याचा अपमान केल्याचेही आढळून आले.

राब यांचा राजीनामा स्वीकारताना सुनक यांनी लिहिले की, या घडामोडींचा नकारात्मक परिणाम होतो, भविष्यात असे प्रसंग घडू नयेत यासाठी सर्व संबंधितांनी खबरदारी घ्यायला हवी. तसेच आरोप खरे ठरल्यास राजीनामा देईन हे आपले शब्द खरे केल्याबद्दल त्यांनी राब यांची प्रशंसा केली. अहवालामध्ये आपल्या वर्तनाविषयी दोन दावे स्वीकारण्यात आले आहेत, असे राब यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. मात्र, आपण काम चांगले व्हावे म्हणूनच कठोर वर्तन करत होतो असा दावा त्यांनी केला आहे. ही प्रक्रिया सदोष आहे आणि यासंबंधी धोकादायक पायंडे पाडले जात असल्याची टीका त्यांनी केली. राब यांच्या राजीनाम्यानंतर सुनक यांना आता मंत्रिमंडळामध्ये बदल करावे लागणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allegation intimidation of employees british deputy prime minister dominic raab resigns ysh