उत्तर प्रदेशमधील लखीमपूरनंतर आता हरियाणातही भाजपा खासदाराच्या ताफ्यातील गाडीने आंदोलक शेतकऱ्याला धडक दिल्याचा गंभीर आरोप झालाय. या प्रकरणी शेतकऱ्यांनी पोलीस तक्रार करत आरोपी भाजपा खासदार नायाब सिंह सैनी आणि त्यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. हरिणायातील अंबाला जिल्ह्यात शेतकरी कृषी कायद्याला विरोध करत असताना गुरुवारी (७ ऑक्टोबर) ही घटना घडली. यात बवनप्रीत नावाचा शेतकरी जखमी झाला.
बवनप्रीत भारतीय किसान संघाचे (BKU) सदस्य आहेत. ते कुरुक्षेत्रचे खासदार नायाब सिंहसैनी आणि राज्य खेळ मंत्री संदीप सिंह यांना काळे झेंडे दाखवत कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी नारायणगड परिसरात आले होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभं राहून खासदारांच्या गाडी ताफ्याला काळे झेंडे दाखवत असताना ताफ्यातील एका गाडीने धडक दिल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. तसेच गाडी चालकाला शेतकऱ्यांना धडा शिकवण्यास सांगितलं असल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आलाय.
हेही वाचा : नवज्योत सिंग सिद्धू १ हजार गाड्यांचा ताफा घेऊन लखीमपूरकडे रवाना, काँग्रेस आक्रमक
बीकेयू शेतकरी संघटनेचे नेते मलकीत सिंह म्हणाले, “आंदोलक शेतकरी सैनी यांचा कार्यक्रम असलेल्या ठिकाणी गेले. त्यावेळी सैनी यांनी घाईत कार्यक्रम ठिकाण सोडलं. त्यावेळी खासदारांच्या ताफ्यातील एका वाहनाने बवनप्रीत यांना धडक मारली.” सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी शेतकऱ्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. तिथं प्राथमिक उपचार करुन सोडून देण्यात आलं.
भाजपा खासदार सैनींकडून आरोपांचं खंडन
भाजपा खासदार नायाब सिंह सैनी यांनी त्यांच्यावरील आरोपांचं खंडन केलंय. उलट शेतकऱ्यांनीच माझ्या कारवर हल्ला केला असा आरोप त्यांनी केलाय. ते म्हणाले, “मी नारायणगडमध्ये सैनी समुदायाच्या एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्यावेळी मला पोलिसांनी आंदोलक कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असल्याचं सांगितलं. यानंतर आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघत असताना आंदोलकांनी माझ्या कारवर हल्ला केला. त्यातील एकाने माझ्या कार चालकाला पकडलं. इतर कर्मचाऱ्यांनी त्याला सोडवलं. आम्ही याविरोधात तक्रार दाखल केली आहे.”