वृत्तसंस्था, नवी दिल्ली : कॅनडाचे उपपरराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर लावलेले आरोप अप्रासंगिक आणि निराधार आहेत, अशा शब्दात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत कॅनडाला सुनावले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाशी निगडित प्रकरणासंदर्भात कॅनडा उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधीला बोलावले. यावेळी भारताची प्रतिमा मलीन करण्याचा कॅनडा सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचेही खडेबोल त्यांना सुनावले.मंगळवारी कॅनडाच्या नागरी आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सुनावणीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राला सांगितल्याचे कॅनडाचे उपपरराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी मान्य केले.
कॅनडाच्या नागरिकांना धमकी देण्यामागे आणि त्यांची हत्या करण्यामागे भारतातल्या एका वरिष्ठ मंत्र्याचा हात होता, असे डेव्हिड मॉरिसन यांनी नागरी आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीला सांगितले होते. रणधीर जयस्वाल यांनी या आरोपांचे पत्रकार परिषदेत खंडन केले. ते म्हणाले, आम्ही काल कॅनडाशी निगडित एका नवीन प्रकरणासंदर्भात कॅनडा उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधीला बोलावले होते. डेव्हिड मॉरिसन यांनी भारताच्या गृहमंत्र्यांवर लावलेले आरोप अप्रासंगिक आणि निराधार आहेत. कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि दुसऱ्या देशांवर प्रभाव टाकण्यासाठी केलेले आहे तसेच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांतून चुकीची माहिती पसरवली आहे. यापूर्वीही असा प्रयत्न झाला आहे. हा सर्व प्रकार कॅनडा सरकारचा राजकीय डाव आहे. अशा बेजबाबदार कृत्यांमुळे दोन देशातील द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल, असे या प्रतिनिधींना सांगण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली.