अंदमान आणि निकोबारचे माजी मुख्य सचिव जितेंद्र नरेन आणि कामगार आयुक्त आर. एल ऋषी यांच्याविरोधात २१ वर्षीय महिलेनं सामूहिक बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. या ‘जॉब फॉर सेक्स’ प्रकरणात विशेष तपास पथकाला (SIT) काही महत्त्वाचे पुरावे सापडले असून पोलिसांनी काही साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. नरेन यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात त्यांच्या पोर्ट ब्लेअर येथील निवासस्थानी २० महिलांना नेण्यात आले होते. या महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे तपासात पुढे आले आहे. लैंगिक शोषणाच्या बदल्यात त्यांच्यापैकी काही महिलांना नोकरी मिळाल्याची धक्कादायक बाबही तपासात पुढे आली आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसआयटीकडून नरेन यांची २८ ऑक्टोबरला चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, या दोन्ही अधिकाऱ्यांचे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स आणि टॉवर लोकेशन सेवा खंडित करण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या घरी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या हार्डडिस्कमधील फुटेज काढून टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नरेन यांची जुलैमध्ये पोर्ट ब्लेअरहून दिल्लीला बदली झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी असलेल्या सीसीटीव्हीशी छेडछाड झाल्याचे पुढे आले आहे.
दरम्यान, हे आरोप नरेन यांनी फेटाळले आहेत. आपल्याविरोधात कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात केला आहे. हे प्रकरण बनावट असून त्यासंदर्भात आपल्याकडे काही विशिष्ट साहित्य असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर नरेन यांना गृह मंत्रालयाकडून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात त्यांना न्यायालयाने १४ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, ऋषी यांनादेखील निलंबित करण्यात आले असून त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे.
तरुणीने तक्रारीत काय म्हटलं?
पीडित तरुणीने आपल्या तक्रारीमध्ये नेमकं घडलं होतं, याचा घटनाक्रम सांगितला आहे. यानुसार, एप्रिल महिन्यात ही तरुणी नोकरीच्या शोधात असताना तिची भेट तत्कालीन कामगार आयुक्त ऋषी यांच्याशी झाली. त्यांनी नोकरीच्या संदर्भात तिची भेट नरेन यांच्याशी घालून दिली. ऋषी या तरुणीला नरेन यांच्या निवासस्थानी घेऊन गेले. तिथे तिला मद्य पिण्याचा आग्रह करण्यात आला. मात्र, त्याला तरुणीने नकार दिला. त्यानंतर तिला मारहाण करण्यात आली आणि तिच्यावर दोघांनी बलात्कार केला, असा दावा तरुणीने तक्रारीत केला आहे.