बिहारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांनी भूल न देताच नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप काही महिलांनी केलाय. शस्त्रक्रिया करताना वेदनेने महिला रडत, ओरडत असताना काही कर्मचाऱ्यांनी महिलांचे हात-पाय धरून आणि तोंड दाबून शस्त्रक्रिया पूर्ण केली, असंही या महिलांनी सांगितलं. यानंतर देशभरात एकच खळबळ माजली. या घटनेने बिहारच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवले काढले आहेत.
बिहारमधील खगरिया जिल्ह्यातील परबत्ता आणि अलौली येथे ११ नोव्हेंबरला ग्लोबल डेव्हलपमेंट इनिशिटीव्ह या स्वयंसेवी संस्थेने (NGO) हे नसबंदी शिबीर घेतलं होतं. या शिबिरात शस्त्रक्रियेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. असं असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी नसबंदीसाठी आलेल्या महिलांचे हातपाय धरले, ओरडू नये म्हणून तोंड दाबलं आणि फरशीवर झोपवून नसबंदीच्या या शस्त्रक्रिया केल्या.
नेमकं काय घडलं?
या शिबिरात शस्त्रक्रिया झालेल्या अलौलीच्या महिला कुमारी प्रतिमा म्हणाल्या, “दोन महिलांची शस्त्रक्रिया करताना आतून महिलांचा ओरडण्याचा आवाज येत होता. त्याविषयी चौकशी केली असता ते म्हणाले की, त्या महिला गुटखा खात होत्या, नशा करत होत्या म्हणून त्यांना त्रास होत आहे. त्यानंतर मी शस्त्रक्रिया करायला गेले तेव्हा त्यांनी भुलीचं इंजेक्शन न देताच शस्त्रक्रिया सुरू केली. तेव्हा मी इंजेक्शन देत नाही का? अशी विचारणा केली. त्यावर ते म्हणाले की, शस्त्रक्रिया झाल्यावर देणार आहेत.”
“योनीजवळून नस ओढून काढल्या”
“यानंतर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी योनीजवळ कापण्यास सुरुवात केली. तेव्हा वेदनेने मी ओरडायला लागले. ते म्हणाले, काही होत नाही, थोडा त्रास होईल. मात्र, त्वचा कापून योनीजवळून नस ओढून काढल्यानंतर मी रडायला लागले, हात-पाय आपटू लागले. त्यानंतर चारजणांनी माझे हात-पाय धरून टाके घातले,” अशी माहिती कुमारी प्रतिमा यांनी दिली.
आरोग्य विभागाकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
हे प्रकरण समोर आल्यानंतर बिहारच्या आरोग्य विभागावर सडकून टीका होत आहे. यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. मात्र, जबाबदारी न घेता आरोग्य विभागाने संबंधित स्वयंसेवी संस्थेकडे बोट दाखवलं. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचीही मागणी होत आहे. या प्रकरणावर सिव्हिल सर्जन डॉ. झा म्हणाले, “या प्रकरणाचा तपास केला जाईल. त्यानंतरच कारवाई होईल.”