पीटीआय, नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) आमदारांना खरेदी करण्याच्या (घोडेबाजार) भाजपच्या प्रयत्नांसंदर्भात भाजपशी संबंधित एका व्यक्तीची कथित ध्वनिफीत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी प्रसृत केली. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा संबंध असेल, तर त्यांना अटक करण्याची मागणीही सिसोदिया यांनी केली.
सिसोदिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही ध्वनिफीत सादर केली. या ध्वनिफितीतील आवाज हा तेलंगणमधील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीच्या आमदारांना खरेदीप्रकरणात अटक केलेल्या तिघांपैकी भाजपच्या एका दलालाचा असल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला आहे. या आरोपांवर भाजप किंवा अमित शहा यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
सिसोदिया यांनी सांगितले, की भाजपचा एक दलाल तेलंगण राष्ट्र समितीच्या आमदाराला भाजपमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव देताना सांगत आहे, की दिल्लीच्या ४३ आमदारांनाही खरेदी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीचे पैशांचे वेगळे नियोजन केले आहे. हा दलाल आपण अमित शहा आणि बी. एल. संतोष यांच्याशीही बोललो असल्याचे सांगताना या ध्वनिफितीत ऐकू येत असल्याचा दावा सिसोदियांनी केला.
सिसोदिया यांचे म्हणणे..
भाजपच्या दलालाकडून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा संदर्भ दिला जात असेल, तर त्यांना (शहा यांना) तत्काळ अटक करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी करून सिसोदिया म्हणाले, की आमदारांचा ‘घोडेबाजार’ करण्याचा भाजपच्या अपयशी ठरलेल्या प्रयत्नांचा हा पुरावा आहे. या प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. सिसोदिया यांनी सांगितले, की देशाचा गृहमंत्री अशा कटात सामील असेल, तर ही देशासाठीची अत्यंत धोकादायक बाब आहे.