‘घातपाती कारवायां’मध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले कथित भारतीय गुप्तहेर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठाविण्यात आल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असलेल्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सने (आयएसआय) प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार रावळपिंडी येथील लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात हेरगिरीच्या आरोपाखाली बलुचिस्तान प्रांतातून कुलभूषण जाधव यांना अटक करण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी जाधव घातपाती कारवाया करत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला होता. याशिवाय, मध्यंतरी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा एका व्हिडिओदेखील प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओत जाधव यांनी आपण भारतीय गुप्तहेर संस्था रॉ साठी काम करत असल्याची कबुली दिली होती. बलुचिस्तान व कराचीत अशांतता निर्माण करण्यासाठी रॉने आपल्याला तैनात केल्याचे त्यांनी व्हिडिओत म्हटले होते. मात्र, या व्हिडिओत अनेक फेरफार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. पाकिस्तानच्या लष्करी कायद्यातील कलम ५९ आणि गोपनीयतेच्या कायद्यातील कलम ३ नुसार जाधव यांच्यावर खटला भरण्यात आला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा