वाराणसी: ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाच्या पूजनाची परवानगी मागणाऱ्या याचिकेवरील निकाल १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. जलदगती न्यायालयाने सोमवारी हा निकाल गुरुवापर्यंत स्थगित केला आहे. हे शिविलग ज्ञानवापी मशिदीच्या संकुलात कथितरित्या सापडले आहे.
वरिष्ठ स्तर सत्र न्यायाधीश महेंद्र पांडे यांनी या प्रकरणाचा निकाल स्थगित केल्याची माहिती जिल्हा सहायक सरकारी वकील सुलभ प्रकाश यानी दिली. २७ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ८ नोव्हेंबपर्यंत हा निकाल राखून ठेवला होता. त्या दिवशी न्यायाधीश रजेवर असल्याने हे प्रकरण सोमवापर्यंत (१४ नोव्हेंबर) स्थगित झाले होते. २४ मे रोजी विश्व वैदिक सनातन संघाचे सरचिटणीस किरण सिंह यांनी या प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला असून, ‘ज्ञानवापी’ संकुलात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात यावी, संकुल सनातन संघाकडे सोपवावे आणि येथील शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. २५ मे रोजी जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी हा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले होते.