आगामी निवडणुकीत काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचे सूतोवाच राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या दोन्ही पक्षांवर टीका केली आहे. लालू आणि काँग्रेसला बिहारचे कृष्णपर्व पुन्हा आणायचे आहे काय, असा सवाल त्यांनी शनिवारी मुझफ्फरपूर येथे उपस्थित केला.  
काँग्रेस आणि आरजेडी बिहारच्या सत्तेत भागीदार असताना निर्माण झालेले कृष्णपर्व अद्याप सर्वाच्या लक्षात आहे. त्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था एवढी ढासळलेली होती, की अपहरणाच्या भीतीने सूर्यास्तानंतर घराबाहेर पडण्याचे धैर्य कोणी करत नसे. या दोन पक्षांच्या अभद्र युतीमुळे १५ वर्षांत बिहारची दुरवस्था झाली, प्रशासन नावालाही नव्हते. आता हेच दोन पक्ष पुन्हा एकदा सत्तेसाठी हातमिळवणी करू पाहत आहेत, त्यांना ते कृष्णपर्व पुन्हा आणायचे आहे काय, असा सवाल नितीश यांनी केला.  
२५ नोव्हेंबर २००५ या दिवशी मी जेव्हा बिहारची सूत्रे प्रथम स्वीकारली तेव्हा राज्याला पूर्वपदावर आणण्यासाठी मला दिवस-रात्र एक करावा लागला. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणे, सर्वसामान्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे, विकासकामे हाती घेणे एवढे करून आम्ही थांबलो नाही तर त्यात यशस्वीही झालो. यात खंड पडू नये, यासाठी आम्ही झटत असताना काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल सत्तेसाठी अभद्र युती करू पाहत आहे, मात्र त्यांचे हे मनसुबे जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
..म्हणून रालोआमधून बाहेर पडलो
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा आपला निर्णय योग्य असल्याचा पुनरुच्चार नितीश यांनी या वेळी केला. घटनेतील ३७०वे कलम, समान नागरी कायदा, अयोध्या प्रश्न अशा काही संवेदनशील विषयांना बाजूला ठेवून रालोआची मोट बांधली गेली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत भाजपकडून या वादग्रस्त विषयांना हात घालण्याचा प्रयत्न होत असल्यानेच आम्ही त्यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा