इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतर भाजपाला कडवी टक्कर देण्याची भाषा काँग्रेस आणि इतर घटक पक्षांनी वापरली होती. मात्र निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, तसे अनेक पक्ष स्वबळावर लढण्याची घोषणा करत आहेत. नितीश कुमार यांनी तर बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. दोन दिवसांनी त्यांचा भाजपाबरोबर शपथविधी पार पडल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होऊ शकेल. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता इतर राज्यातील प्रादेशिक पक्षही काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. याठिकाणी समाजवादी पक्षाने काँग्रेसला ११ जागा देऊ केल्या आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एक्स अकाऊंटवर याची घोषणा केली.
काय म्हणाले अखिलेश यादव?
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एक्सवर पोस्ट टाकत म्हटले, “काँग्रेसबरोबर आमची ११ जागांवर सहमती झाली आहे. आमच्या सौहार्दपूर्ण आघाडीची ही चांगली सुरुवात झाली आहे. आमची आघाडी विजयाच्या समीकरणासह पुढे जाईल. इंडिया आघाडीची टीम आणि पीडीएची रणनीती एक नवा इतिहास घडवेल.” (पीडीए म्हणजे – पिछडा, दलित, अल्पसंख्याक) काँग्रेस यूपीमध्ये ८० पैकी २३ जागांवर निवडणूक लढवू इच्छिते, अशा चर्चा मध्यंतरी सुरू होत्या. मात्र आता समाजवादीचे प्रमुख अखिलेश यांनी जाहीर केल्यामुळे ११ जागा काँग्रेसला मिळतील, असे दिसत आहे.
प्रदेश काँग्रेसची नाराजी
समाजवादी पक्षाने जागावाटपाचा आकडा जाहीर केला असला तरी उत्तर प्रदेश काँग्रेसने त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अखिलेश यादव यांनी हा एकतर्फी निर्णय घेतला असून त्याबाबत काँग्रेसची सहमती नाही, असेही राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सांगितले आहे. समाजवादी पक्षाने काँग्रेसला ११ तर राष्ट्रीय लोकशाही दल या पक्षाला सात जागा सोडल्या आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची अधिकृत आघाडी झाली नव्हती. पण समाजवादी पक्षाने काँग्रेसच्या परंपरागत रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघात कोणताही उमेदवार दिला नव्हता. अमेठीमधून राहुल गांधी आणि रायबरेलीमधून सोनिया गांधी यांनी निवडणूक लढविली होती.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे आकडे
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ८० पैकी ६२ जागांवर विजय मिळविला. समाजवादी पक्षाने बहुजन समाज पक्षासह आघाडी केली होती. सपाने ३७ जागा लढविल्या त्यात त्यांना अवघ्या पाच जागांवर विजय मिळू शकला. काँग्रेसने ६७ जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र त्यांना केवळ एका जागेवरच समाधान मानावे लागले. बसपाने ३८ ठिकाणी उमेदवार उभे केले, त्यापैकी त्यांना दहा मतदारसंघात विजय मिळाला.