Allu Arjun : अल्लू अर्जुनला पुष्पा २ प्रीमियरच्या वेळी जी चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा मृत्यू झाला त्या प्रकरणात अटक करण्यात आली. आता या प्रकरणात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो त्यापुढे कुणीही लहान मोठा नसतो असं पवन कल्याण यांनी म्हटलं आहे. तसंच हे प्रकरण इतक्या पटकन संपेल असं वाटत नाही असंही कल्याण म्हणाले.
पवन कल्याण म्हणाले
संध्या थिएटर या ठिकाणी झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. मला हे ठाऊक नाही की याआधी तिथे अशी घटना घडली आहे की नाही. मात्र मी या घटनेबाबत पोलिसांना मुळीच दोष देणार नाही. त्यांना सुरक्षेबाबत सर्वात आधी दक्षता घ्यावी लागते. त्यामुळे जे घडलं, चेंगराचेंगरीचा जो प्रकार झाला त्यात पोलिसांचा काही दोष आहे असं मला वाटत नाही. तसंच अल्लू अर्जुनला जेव्हा समजलं की त्याच्या प्रीमियरसाठी आलेल्या महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे तेव्हा त्याने त्या मृत महिलेच्या कुटुंबाची भेट घ्यायला हवी होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी जी पावलं उचलली आणि ज्या प्रतिक्रिया या प्रकरणावर दिल्या आहेत त्या योग्यच आहेत.
हे पण वाचा- कोर्टात चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून अल्लू अर्जुनला सुनावणीत व्हर्च्युअली हजर राहण्याची परवानगी
काय आहे हे प्रकरण?
२ आणि ४ डिसेंबरला अल्लू अर्जुनच्या पुष्पा द रुल या सिनेमाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुन आला. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. त्यावेळी चेंगराचेंगरीही झाली. या चेंगराचेंगरीत रेवती नावाच्या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यानंतर अल्लू अर्जुनच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला अटक झाली होती. तसंच आंध्र प्रदेशच्या विधानसभेत या मुद्दा चर्चिला गेला. अल्लू अर्जुनला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी जामीन मिळाला. यानंतर पत्रकार परिषद घेऊन अल्लू अर्जुनने त्याची बाजू मांडली होती. जी घटना घडली त्यानंतर आपल्याला खूप दुःख झालं. तसंच मी त्या घटनेमुळे खूप अस्वस्थ झालो असंही अल्लू अर्जुनने म्हटलं होतं. यानंतर पहिल्यांदाच आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
पुष्पा द रुल हजार कोटींची कमाई अवघ्या सात दिवसांत
पुष्पा द रुल हा चित्रपट ५ डिसेंबरला रिलिज झाला. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फाजिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात पहिल्या सात दिवसांतच हजार कोटींची कमाई केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर वेगाने व्यवसाय करणारा हा या वर्षातला पहिलाच चित्रपट ठरला आहे.