Allu Arjun House Attack : अभिनेता अल्लू अर्जून याच्या घरावर हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना हैदराबाद न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हैदराबादमधील ज्युबली हिल्स परिसरात अल्लू अर्जुनचे घर आहे. काल काही जणांनी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला केला होता. त्यानंतर यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींना हैदराबाद न्यायालयाने १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या सहा जणांना हैदराबाद न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांना आज सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
हैदराबाद पश्चिम विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी हातात फलक घेत काही लोक अल्लू अर्जुनच्या घरात घुसले. यावेळी घोषणा देत हे लोक सुरक्षा भींतीवर चढत टोमॅटो फेकू लागले. त्यानंतर सहा लोकांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी बोलताना आरोपीचे वकील रामदास म्हणाले की, “ओस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थी शांततेत आंदोलन करत होते. तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर केल्याने स्वसंरक्षणासाठी प्रतिकार केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायमूर्तींनी कोणत्याही अटी आणि दंडाशिवाय जामीन मंजूर केला.”
मुख्यमंत्र्यांवर आरोप
दरम्यान, भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांनी, या आरोपींपैकी एकजण मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचा सहकारी असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांवर मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी किंवा काँग्रेसच्या कोणत्याही स्पष्टीकरण दिले नाही. बीआरएसचे नेते कृषांक यांनी आरोप केला की, यातील एक आरोपी मुख्यमंत्र्यांचा सहकारी आहे. तो २०१९ ची जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेसकडून लढला होता.
चार डिसेंबर रोजी हैदराबादमधील एका चित्रपटगृहात पुष्पा २ चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुनही आला होता. त्याला बघण्यासाठी गर्दी जमल्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला. यानंतर या प्रकरणाचे पडसाद अजूनही पाहायला मिळत आहेत.
काय आहे प्रकरण?
काल हैदराबादमधील ज्युबली हिल्स परिसरात असलेल्या अल्लू अर्जुनच्या घरावर काही जणांकडून हल्ला करण्यात आला होता. यावेळी हल्लेखोरांनी त्याच्या घरात घुसून तोडफोड केली आहे. या प्रकरणात आपला दोष नसून जो काही प्रकार घडला तो खेदजनक आहे, त्यासाठी मी माफीही मागतो असंही अल्लू अर्जुनने म्हटले होते. पण त्याच्याविरोधातला उद्रेक काही कमी व्हायचे नाव घेईना.