पीटीआय, वॉशिंग्टन : ‘भारत आणि पाकिस्तानशी असलेल्या संबंधांकडे एकाच नजरेने अमेरिका पहात नाही. हे दोन्ही देश वेगवेगळय़ा प्रकारे अमेरिकेचे भागीदार मित्र आहेत,’ असा खुलासा अमेरिकेने केला आहे. पाकिस्तानला अमेरिकेने ‘एफ-१६’ लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलरची मदत दिल्याबद्दल, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी उपस्थित केलेल्या सवालानंतर अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने ही बाब स्पष्ट केली.
हेही वाचा >>> ‘पीएफआय’बरोबरील रद्द करारावरून राजकारण; पुण्यात भाजप, राष्ट्रवादी यांची परस्परांवर टीका
पाकिस्तानला ‘एफ-१६’ लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी अमेरिकेकडून दिली जाणारी ४५ कोटी डॉलरची मदत ही दहशतवादाशी लढण्यासाठी दिली जात आहे, या अमेरिकेच्या स्पष्टीकरणाबाबत परराष्टमंत्री जयशंकर यांनी भारत-अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, की ‘एफ-१६’ या अत्याधुनिक विमानांचा वापर कुठे आणि कुणाविरुद्ध केला जातो, हे सर्वानाच ठाऊक आहे. असे स्पष्टीकरण देऊन तुम्ही कुणाला मूर्ख तर बनवत नाही ना?
हेही वाचा >>> ‘वैद्यकीय शिक्षण सुधारणांच्या नावे काँग्रेसने पैसे कमावले’
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी आपल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत यावर स्पष्टीकरण देताना सांगितले, की भारत आणि पाकिस्तान आमचे वेगवेगळय़ा संदर्भात भागीदार आहेत. त्यांच्याकडे आम्ही एकाच नजरेने पहात नाही. भारताशी आमचे वेगळय़ा प्रकारचे संबंध आहेत. पाकिस्तानशी वेगळे नाते आहे. अनेक बाबतीत आमचे परस्परांशी वेगवेगळय़ा संदर्भातील हितसंबंध आहेत. या दोन्ही देशांचे परस्परसंबंध शक्य तितके सौहार्दपूर्ण असावेत, यासाठी आम्ही शक्यतो सर्व प्रयत्न करू इच्छितो. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानने अफगाणी तालिबानी व हक्कानी नेटवर्क या दहशतवादी गटांना थारा दिल्याबद्दल ‘एफ-१६’ विमानांसंदर्भात मदत रोखली होती. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी पाकिस्तानची रोखलेली ही मदत देण्याचा निर्णय घेतला होता.