Fact-Checker Mohammed Zubair अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील स्थानिक न्यायालयाने दिले आहेत. २५ जुलैपर्यंत झुबेर यांना न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. न्यायालयाने झुबेर यांना पोलीस कोठडी देण्यास नकार दिला आहे.
धार्मिक भावना दुखावणे आणि द्वेषाला उत्तेजन दिल्याच्या आरोपाखाली अटक
मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी धार्मिक भावना दुखावणे आणि द्वेषाला उत्तेजन दिल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. चार वर्षांपूर्वीच्या एका ट्वीटप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एका ट्वीटर युजरने केलेल्या तक्रारीच्या आधारे झुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अॅण्ड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (इफ्सो) या शाखेने त्यांना अटक केली होती.
हेही वाचा- “सैन्यात असंतुष्ट मुलं गेली तर…”; अग्निपथवरून मेघालयच्या राज्यपालांचे मोदी सरकारवर टीकास्र
पोलीस कोठडीची मागणी
खीमपूर खेरी पोलिसांनी स्थानिक न्यायालयात मोहम्मद झुबेर चौकशी करण्यासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने पोलिसांची ही मागणी मान्य केली नसून झुबेर यांना न्यायलयीन कोठडी सुनावली असल्याचे अतिरिक्त अभियोजन अधिकारी अवधेश कुमार यांनी सांगितले. तसेच झुबेर यांच्या पोलीस कोठडीच्या याचिकेवर १३ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचेही कुमार म्हणाले.
हेही वाचा० “घरावरुन काँग्रेसचे झेंडे काढा, यांच्या सर्व सुविधा बंद करा,” भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
नोहेंबरमध्ये एफआयआर दाखल
२५ नोहेंबर २०२१ रोजी एका खाजगी वृत्तवाहिनीचे पत्रकार आशिष कटियार यांनी झुबेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. कटियार यांनी आपल्या तक्रारीत झुबेर यांनी चॅनलबद्दल ट्वीट करून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता. मात्र, स्थानिक पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने कटियार यांनी लखीमपूर खेरी येथील स्थानिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर, झुबेर यांच्याविरुद्ध आयपीसी कलम १५३ ए (दोन गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.