महिला पत्रकाराशी असलेल्या संबंधांची जाहीर कबुली देणाऱ्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी नरेंद्र मोदींवर टीका केली. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी गेली अनेक वर्षे आपल्या पत्नीबाबतची माहिती लपवून ठेवली. मात्र आपण त्यांच्यासारखे डरपोक नसून महिला पत्रकाराशी लग्न करण्याच्या निर्णयाची आपण जाहीर वाच्यता केल्याचेही सिंह यांनी सांगितले.
दिग्विजय सिंह यांनी महिला पत्रकारासोबतच्या संबंधांची दिलेली जाहीर कबुली ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेससाठी डोकेदुखी आहे. आपल्या निर्णयाबाबत दिग्विजय सिंह म्हणाले की, मी मोदींप्रमाणे माझे कोणतेही नाते लपवलेले नाही. मी मोदींसारखा डरपोक नाही. त्यामुळे माझ्या नात्याबाबत मोकळेपणाने चर्चा केल्याचे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस असणाऱ्या ६७ वर्षांच्या दिग्विजय सिंह यांनी सांगितले.
दिग्विजय सिंह यांनी बुधवारी महिला पत्रकार अमृता रॉय यांच्याशी संबंध असल्याचे ट्विटरवरून जाहीर केले होते. तसेच रॉय यांच्याशी आपण लवकरच विवाह करणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
अमृता रॉय यांचा घटस्फोट होणार आहे. त्यामुळे कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर आपण विवाहबंधनात अडकणार असल्याचे दिग्विजय सिंह यांनी जाहीर केले आहे.
दिग्विजय सिंहांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मोदी यांनी आपल्या पत्नीचा प्रथमच उल्लेख केल्यानंतर काँग्रेस आणि दिग्विजय सिंह यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
मात्र आता स्वत: दिग्विजय सिंहांचे महिला पत्रकाराशी असलेले संबंध समोर आल्यामुळे काँग्रेसच्या गोटातही खळबळ उडाली आहे.
मुलाचा पाठिंबा
त्यांचे पुत्र आणि मध्य प्रदेशातील आमदार जयवर्धन सिंह यांनी आपल्या पित्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. पुन्हा लग्न करण्याचा आपल्या वडिलांचा निर्णय हा खासगी असून आपला त्याला पूर्ण पाठिंबा असल्याचेही जयवर्धन सिंह यांनी सांगितले.
कॉंग्रेसची सावध प्रतिक्रिया
‘कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले की, कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्याबाबत प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मग ती व्यक्ती काँग्रेसची असो वा इतर राजकीय पक्षाची. ती बाब त्या व्यक्तीवरच सोडून द्यावी, असे चिदंबरम यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा