Amanatullah Khan Waqf Board Land Case : आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांना गेल्या आठवड्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक अफरातफर केल्याच्या प्रकरणात अटक केली होती. ईडीने आधी त्यांचं घर व कार्यालयावर छापेमारी केली, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दिल्लीतल्या वक्फ बोर्डाच्या कथित जमीन घोटाळाप्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, ईडीने आज त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्यांची २३ सप्टेंबरपर्यंत (१४ दिवस) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ईडीने स्वतःहून न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. तशीच याचिका दाखल करण्यात आली होती.
ईडीने न्यायालयाला सांगितलं की आम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेली सामग्री अमानतुल्लाह खानसमोर सादर केली. त्यावरील त्यांचा जवाब नोंदवला आहे. सहआरोपींबरोबरचे मेसेजेस दाखवून त्यावरील त्यांचं स्पष्टीकरून नोंदवलं आहे. या मुख्य प्रकरणातील कलम ४ अंतर्गत केली जाणारी तपासणी पूर्ण झाली आहे.
हे ही वाचा >> Worker Death : १०४ दिवसांत फक्त एक दिवस सुट्टी, कामाचा ताण असह्य झाल्याने कामगाराचा मृत्यू; कुठे घडली घटना?
अमानतुल्लाह खान हे आम आदमी पार्टीचे आमदार आहेत. दिल्लीतल्या ओखला या मतदारसंघाचं ते प्रतिनिधीत्व करतात. सक्तवसुली संचालनालय व त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर दिल्ली वक्फ बोर्डाच्या संचालकपदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात जो आर्थिक गैरव्यवहार झाला त्याचा तपास ईडीकडून केला जात आहे. मागील सोमवारी (२ सप्टेंबर) सकाळी ईडीचं पथक अमानतुल्लाह यांच्या घरी पोहोचलं. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी आमदार अमानतुल्लाह खान व ईडीचे अधिकारी यांच्यात बाचाबाचीही झाली. काही तास या ठिकाणी झडती घेतल्यानंतर ईडीने अमानतुल्लाह यांना अटक केली होती. तेव्हापासून ते ईडीच्या ताब्यात होते. आता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
हे ही वाचा >> अदाणी समूहाचा बांगलादेशला इशारा; “गोड्डा वीज प्रकल्पाची ५० कोटी डॉलर्सची थकबाकी…”!
दिल्ली वक्फ बोर्डाचा घोटाळा काय आहे?
दिल्ली सरकारच्या महसूल विभागाच्या मुख्यालयाने २०१६ मध्ये वक्फ बोर्डाचे माजी तत्कालीन अध्यक्ष अमानतुल्लाह खान यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. अमानतुल्लाह खान यांनी वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करुन मनमानी पद्धतीने नियुक्त्या केल्या होत्या, असा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) देखील तपास करत आहे. सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वक्फ बोर्डाचा कारभार करताना अमानतुल्लाह खान यांनी जाणीवपूर्वक नियमांची पायमल्ली केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यामुळे सरकारी खजिन्याचं नुकसान झाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. त्यांनी केलेली भरती प्रक्रिया पारदर्शी नव्हती, असं सीबीआयने म्हटलं आहे. त्यांनी पारदर्शीपणे भरती केली असती तर लायक उमेदवारांना नोकरी मिळाली असती असंही सीबीआयने त्यांच्या आरोपात म्हटलं आहे.