नवी दिल्ली : काँग्रेसमधून आयात केलेल्या नेत्यांना भाजपने मानाचे स्थान दिले असून काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, पंजाबमधील काँग्रेसचे माजी नेते सुनील जाखड यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, आठ महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले जयवीर शेरगील यांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे.
अमरिंदर सिंग, सुनील जाखड आणि जयवीर शेरगील हे तिघेही पंजाबमधील असून त्यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी झालेल्या मतभेदानंतर पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. अमरिंदर सिंग यांनी स्वतंत्र पक्ष काढला होता, मात्र पंजाबमधील विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात असून या तिघांनाही काँग्रेसविरोधात आक्रमक होण्याचा आदेश देण्यात आला आहे. शेरगील यांनी काँग्रेसमध्येही प्रवक्तेपद सांभाळले होते, त्यांच्या काँग्रेसमधील प्रभावी कामगिरीचा भाजपने आता काँग्रेसविरोधात वापर करून घेण्याचे ठरवले आहे.
याशिवाय, भाजपचे उत्तर प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांचीही राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तराखंडमधील मदन कौशिक, छत्तीसगडमधील विष्णुदेव साय, पंजाबमधील एस. राणा गुरमीत सिंह सोदी, मनोरंजन कालिया व अमरज्योत कौर रामूवालिया हे पाच नेते कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य असतील.