श्रीनगर/जम्मू : काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली. यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीने बालटाल आणि नुनवान येथील बेस कॅम्पमधून दक्षिण काश्मीर हिमालयातील ३,८८० मीटर उंचीवरील गुंफा मंदिराकडे प्रवास सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनंतनागमधील पारंपरिक ४८ किलोमीटरचा नुनवान-पहलगाम मार्ग आणि गांदरबलमधील १४ किलोमीटरचा लहान पण उंच बालटाल मार्गावरून शनिवारी पहाटे यात्रेकरू रवाना झाले.
हेही वाचा >>> केजरीवाल यांना १४ दिवसांची कोठडी
उपायुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नागरी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित दुहेरी मार्गावरील यात्रेला प्रारंभ झाला. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी ४,६०३ यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला जम्मूमधील भगवती नगर येथील यात्री निवास बेस कॅम्प येथून हिरवा झेंडा दाखवला. हे यात्रेकरू शनिवारी दुपारी काश्मीर खोऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे स्थनिक नागरिक आणि प्रशासनाने स्वागत केले.
अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस आणि इतर निमलष्करी दलांचे हजारो सुरक्षा कर्मचारी येथे तैनात करण्यात आले आहेत. यात्रेच्या ठिकाणी हवाई देखरेखही ठेवली जाणार आहे. ५२ दिवस चालणारी ही यात्रा १९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. शनिवारी १८८१ यात्रेकरूंची दुसरी तुकडी भगवती नगर बेस कॅम्प येथून चोख सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली.
ओएनजीसीतर्फे १०० खाटांची दोन रुग्णालये
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात ओएनजीसीतर्फे अमरनाथ बेस कॅम्पमध्ये १०० खाटांची दोन रुग्णालये उभारली आहेत. यात्रेनंतरही रुग्णालये सुरूच राहणार आहे. शाश्वत आरोग्य सेवेची गरज ओळखून ओएनजीसीने त्यांच्या ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत अनंतनागमधील बालटाल आणि चंदनवारी-पहलगाम येथे कायमस्वरूपी रुग्णालये बांधल्याचे निवेदनात म्हटले आहे.