लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आणखी तीन टप्प्यातील मतदान बाकी असून ते लवकरच पार पडेल. आता पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार येईल, असा दावा केला आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावा केला आहे. असे असतानाच आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे.

इंडिया आघाडीला केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी तृणमूल काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार असल्याची भूमिका ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. या इंडिया आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुका लढवल्या जात आहेत. मात्र, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’चा नारा दिलेला आहे. कोणत्याही पक्षांबरोबर आघाडी केलेली नाही. मात्र, ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीशी नातं तोडलेलंही नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्याची चर्चा होती. मात्र, याबाबत आता ममता बॅनर्जी यांनी स्वत:च भूमिका जाहीर केली आहे.

हेही वाचा : ‘व्होट जिहाद’चा काँग्रेसचा डाव! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघाती आरोप

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका सभेला संबोधित करताना भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, “या लोकसभा निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार असेल आणि इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात स्थापन होणार असेल तर तृणमूल काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे”, अशी मोठी घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली. आम्ही केंद्रात सत्ता स्थापन केल्यास पश्चिम बंगालच्या माता भगिनींना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असं मतही यावेळी ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी यावेळी आणखी एक भूमिका घेतली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा सीपीएम आणि काँग्रेसचा काहीही संबंध नाही. पश्चिम बंगालमध्ये सीपीएम आणि काँग्रेसची आघाडी आहे. त्यावरून ममता बॅनर्जी यांनी घणाघाती टीका केली. तसेच हे दोघे भाजपाबरोबर असल्याचा आरोपही ममता बॅनर्जींनी केला. सध्या पश्चिम बंगालमध्ये काही मतदारसंघात सीपीएम, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस आमनेसामने आले आहेत, त्यावरून ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोल केला.

Story img Loader