ट्विटर, मेटानंतर आता अ‍ॅमेझॉननेही कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. नोकरीवरुन काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेलद्वारे याबाबतची पूर्वसुचना देण्यात आली आहे. दुसरी नोकरी शोधण्यासाठी कंपनीकडून या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या नोकरकपातीच्या सर्वाधिक फटका ‘डिव्हाइसेस अँड सर्व्हिसेस’ विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. आठवड्याभरात अ‍ॅमेझॉनकडून विविध विभागांमधून तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची शक्यता आहे.

विश्लेषण : फेसबुक, ट्विटरनंतर आता अ‍ॅमेझॉन; जगप्रसिद्ध कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून का काढत आहेत?

दुसरी नोकरी शोधण्यास अपयशी ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून आर्थिक साहाय्य केलं जाणार आहे. शिवाय रोजगार मिळवण्यासाठी मदतही केली जाणार आहे. “अ‍ॅमेझॉनने प्रभावित कर्मचाऱ्यांना आधीच सुचित केले आहे. या प्रत्येक कर्मचाऱ्याला साहाय्य करण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी कंपनीकडून काम केलं जात आहे. नवी नोकरी शोधण्यासाठी कंपनीकडून या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे”, असे कंपनीच्या अधिकृत निवेदनात ‘डिव्हाइसेस अँड सर्व्हिसेस’ विभागाते वरिष्ठ उपाध्यक्ष डॅव्हिड लीम्प यांनी म्हटले आहे.

Photos : Amezon पासून Domino’s पर्यंत ‘या’ प्रसिद्ध कंपन्यांच्या लोगोमध्ये दडलंय रहस्य, जाणून घ्या याचा नेमका अर्थ

काही भुमिकांची कंपनीला गरज नसल्याचं सांगत प्रतिकुल आर्थिक परिस्थितीमुळे नोकरकपातीचा निर्णय घेण्यात आल्याचं लीम्प म्हणाले आहेत. दरम्यान, मेटानेही गेल्या आठवड्यात तब्बल ११ हजार लोकांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. ही कपात एकूण कर्मचाऱ्यांच्या १३ टक्के आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरकपात कंपनीच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. महसुलात घट आणि वाढत्या खर्चामुळे आर्थिक नियोजन करण्यासाठी मार्क झकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. याआधी ट्विटरने आपल्या साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या ५० टक्के आहे.