Ambadas Danave On Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काल (शनिवारी) रात्री चेंगराचेंगरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका देखील केली जात आहे. विरोधकांकडून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील या घटनेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपाचे अश्विनी वैष्णव राजीनामा देणार नाहीत कारण नैतिकताच शिल्लक राहिलेली नसल्याचे म्हटले आहे.
वंदे भारत सारख्या रेल्वे गाड्यांचे श्रेय घेण्यासाठी भाजपाचे नेते पुढे असतात पण दिल्लीत घडलेल्या चेंगराचेंगरीची जबाबदारी घ्यायला ते मागे राहातात असेही दानवे म्हणाले आहेत. त्यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “वंदे भारतसारख्या गाड्यांचे क्रेडिट घ्यायचे असल्यास भाजपाचे नेते सश्यासारखे धावतात. पण दिल्ली सारख्या घटनांची जबाबदारी घेण्यासाठी यांची चाल कासावसारखी होते”.
इतिहासात प्रशासकीय व्यवस्थेची चूक असेल तर मंत्र्यांनी राजीनामा दिल्याची उदाहरणे देखील दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहेत. लाल बाहदूर शास्त्री, नितीश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“सिस्टिमची चूक असताना लाल बहादूर शास्त्री, नितीश कुमार नैतिक जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात. ते भाजपाचे अश्विनी वैष्णव देणार नाहीत. कारण नैतिकता उरलेली नाही! मग जबाबदारी कसली?,” असेही दानवे म्हणाले आहेत.
राहुल गांधीची टीका
“नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनापासून सहानुभूति व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता समोर आली आहे. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती. सरकार आणि प्रशासनाने गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये याची काळजी घ्यावी,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिली.
चेंगराचेंगरी का झाली?
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी दररोज लाखो भाविक दाखल होत आहेत. अशात काल रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये १८ जणांचा मृत्यू झाला असून, १५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.