खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर याची जून महिन्यात कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा दावा करत कॅनडानं भारताच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. तर दुसरीकडे भारतानंही जशास तसं वागत कॅनडाचे दावे फेटाळतानाच कॅनडाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. या मुद्द्यावरून भारत व कॅनडामधील संबंध ताणले जात असताना अमेरिकेतील आंतरराष्ट्रायी संबंधांच्या अभ्यासकांनी कॅनडाच्या या कृतीचा परखड शब्दांत समाचार घेतला आहे.
“भारतानं या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष घालावं यासाठी आम्ही हे केलं”, असं स्पष्टीकरण कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आता दिलं आहे. मात्र, ही निर्लज्ज कृती असल्याचं अमेरिकेतील अभ्यासकांचं मत आहे. तसेच, अमेरिकेनं या प्रकारात कॅनडाची साथ देऊ नये, असा सल्लाही त्यांनी बायडेन सरकारला दिला आहे.
हडसन इन्स्टिट्यूटमधील वरीष्ठ अभ्यासक मायकेल रुबिन यांनी एका वाहिनीवरील चर्चेदरम्यान यासंदर्भात आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “जस्टिन ट्रुडो अशा लोकांच्या सल्ल्याने हे सर्व करत आहेत, ज्यांना खलिस्तानी चळवळ ही त्यांच्या फायद्याची वाटते. जस्टिन ट्रुडो यांची ही कृती निर्लज्ज व वेडगळपणाची आहे. अमेरिकेनं यामध्ये ट्रुडो यांच्या बाजूने उभं राहू नये”, असं रुबिन म्हणाले आहेत.
भारत व पाकिस्तानबाबत वेगवेगळी भूमिका!
दरम्यान, रुबिन यांनी कॅनडाकडून भारत व पाकिस्तानबाबत वेगवेगळी भूमिका घेतली जात असल्याचा दावा केला आहे. “कॅनडामध्ये करीम बलुच नावाच्या व्यक्तीची पाकिस्तानच्या मदतीने हत्या करण्यात आल्याचं प्रकरणही प्रलंबित आहे. मात्र, ते प्रकरण पोलीस हाताळत आहेत. त्यावर ट्रुडो यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मग हा भेदभाव का केला जात आहे? ट्रुडो यांना दीर्घकाळात कदाचित याचा फायदा होऊ शकेल, पण याला नेतृत्व म्हणत नाहीत. त्यांनी जबाबदारीने वागायला हवं. कारण ते आगीशी खेळत आहेत”, असंही रूबिन यांनी नमूद केलं आहे.
भारत-कॅनडा तणाव वाढला; पंतप्रधान ट्रुडो म्हणतात, “आम्हाला हे प्रकरण वाढवायचं नव्हतं, फक्त…
“अमेरिकेतील शीखांचा खलिस्तानी चळवळीला पाठिंबा नाही”
दरम्यान, सिख्स ऑफ अमेरिका या संघटनेचे प्रमुख जस्सी सिंग यांनी “खलिस्तानी चळवळ अमेरिकेतील बहुसंख्य शीखांचं प्रतिनिधित्व करत नाही”, असं ठामपणे सांगितलं आहे. “भारतातील शिखदेखील खलिस्तानी चळवळीला पाठिंबा देत नाहीत. आज भारतीय सैन्यात मोठ्या संख्येनं शीख आहेत. ते पाकिस्तानविरुद्धही लढतात व चीनविरुद्धही लढतात. अमेरिकेत १० लाख शीख राहतात. पण त्यातले अगदी मोजकेच खलिस्तानची मागणी करणाऱ्या आंदोलनात दिसतात”, असं जस्सी सिंग म्हणाले आहेत.