अमेरिकेतील फ्लोरिडा येथील मियामी समुद्र किनाऱ्याजवळ असलेली एक १२ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत एक जण दगावला आहे. तर ९९ जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत १०२ जणांना सुखरुपरित्या बाहेर काढलं आहे. क्रेनच्या मदतीने ढिगारा बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. दुर्घटनेची गंभीरता पाहता फ्लोरिडा सरकारने पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा आवाज येत असल्याचं अग्निशमन दल सहाय्यक प्रमुख जदल्लाह यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ढिगारा बाजूला काढताना काळजी घेतली जात आहे. या कामासाठी सोनार सिस्टम, कॅमेरे, हॅमर्स आणि मशिनचा वापर केला जात आहे. “१२ मजली इमारत होती. यात १३० हून अधिक यूनिट्स होते. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. जिथपर्यंत लोकांना बाहेर काढत नाहीत. तोपर्यंत बचावकार्य सुरुच राहिल”, असं फ्लोरिडाच्या महापौर डेनिएला लेविन यांनी सांगितलं आहे. ही इमारत पडल्यानंतर आसपासच्या इमारतींचही नुकसान झालं आहे.
या इमारतीचं बांधकाम १९८०च्या दशकात करण्यात आलं होतं. ही इमारत ४० वर्षे जुनी होती. त्याच्या छताच्या दुरुस्तीचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरु होतं. इमारत कशामुळे कोसळली याबाबत अद्याप ठोस कारण मिळालेलं नाही. स्ट्रक्चरल इंजिनिअरर्सची टीम इमारत दुर्घटनेचा तपास करत आहे. या इमारतीचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. बचावकार्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी येथील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.