दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक झाली. यानंतर न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगात असून त्यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईवर जर्मनीने एक टिप्पणी केली होती. जर्मनीने केलेल्या टिप्पणीनंतर भारताने संतप्त प्रतिक्रिया देत खडेबोल सुनावले होते. आता अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईप्रकरणी अमेरिकेनेही प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकेने काय प्रतिक्रिया दिली?
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, “मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईवर भारतातील विरोधी पक्ष लक्ष ठेऊन आहेत. तसेच केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या प्रकरणावर आम्हीदेखील बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. निष्पक्षपणे कायद्याच्या प्रक्रियेचे पालन होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
हेही वाचा : “बराक ओबामा ISIS चे संस्थापक, मॉस्कोतील मृतांना तेच जबाबदार”, डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हीडिओ व्हायरल!
जर्मनीने काय प्रतिक्रिया दिली होती?
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेसंदर्भात जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये जर्मनीने म्हटले होते, “अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईची आम्ही दखल घेतली आहे. भारत लोकशाही असणारा देश आहे. केजरीवाल यांना निष्पक्ष खटला चालवण्याची संधी मिळेल, अशी आम्हाला आशा आहे”, अशी प्रतिक्रिया जर्मनीने दिली होती.
भारताने सुनावले होते खडेबोल
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने टिप्पणी केली होती. यानंतर भारताने नाराजी व्यक्त केली होती. तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जर्मन राजदूताकडे यासंदर्भात नाराजी व्यक्त करत जर्मनीने केलेली टिप्पणी ही भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप आहे, असे म्हटले होते. “अशा प्रकारच्या टिप्पण्यांना आम्ही देशाच्या न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करणे किंवा आमच्या न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर हल्ला करण्याच्या दृष्टीने पाहतो. भारत हा लोकशाही असणारा देश असून जर्मनीने केलेले वक्तव्य अयोग्य आहे”, असे खडेबोल भारताने जर्मनीला सुनावले होते.