Indians not forced to remove turbans during deportation by US : अमेरिकेत अवैध प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांविरोधात गेल्या महिन्यात ट्रम्प प्रशासनाने कठोर कारवाई केली होती. अमेरिकन लष्कराच्या तीन विमानातून शेकडो भारतीयांना मायदेशी परत पाठवण्यात आले. या दरम्यान भारतीय नागरिकांना विमानात वाईट वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंरत भारत सरकारने याबद्दल औपचारिक स्वरूपात चिंता व्यक्त केली होती, यानंतर आता अमेरिकेने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भारताने उपस्थित केलेल्या चिंता या विशेषतः धार्मिक संवेदनशीलता आणि प्रवाशांना देण्यात आलेले अन्न या संबंधित होत्या अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंह यांनी गुरूवारी राज्यसभेत दिली. केंद्र सरकारने सांगितले की, परत पाठवले जात असताना शीख निर्वासितांना त्यांची पगडी काढायला लावल्याचा, तसेच महिला व लहान मुलांना बेड्या घातल्याचा वृत्तांबाबत भारताने तीव्र आक्षेप घेतला.
“मंत्रालयाने अमेरिकन प्रशासनाकडे ५ फेब्रुवारी रोजी उतरलेल्या विमानातील निर्वासितांना देण्यात आलेल्या वागणुकीबाबत विशेषतः महिलांना बेड्या घालण्यात आल्याच्या मुद्दयावर अत्यंत कठोर शब्दात चिंता व्यक्त केल्या. त्यावर अमेरिकेने माहिती दिली आहे की १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी भारतात उतरलेल्या निर्वासितांना घेऊन आलेल्या विमानांमध्ये कोणत्याही महिला किंवा मुलांना बेड्या घालण्यात आल्या नव्हत्या,” असे सभागृहात सांगण्यात आले.
सिंह यांनी सांगितले की, अमेरिकन अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीकडून व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेला उत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की कोणत्याही निर्वासितांना डोक्यावरील धार्मिक वस्त्र काढण्यास सांगण्यात आले नाही आणि विमान प्रवासादरम्यान त्यांना फक्त शाकाहारी जेवण देण्यात आले. “त्यांच्या उत्तरात अमेरिकन अधिकार्यांनी सांगितले की, ५, १५ आणि १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आलेल्या तीन चार्टर्ड विमानांमधील निर्वासितांना डोके झाकण्याचे धार्मिक कापड (पगडी) काढण्याचे आदेश देण्यात आले नव्हते आणि निर्वासितांनी विमान प्रवासादरम्यान शाकाहारी जेवणाव्यतिरिक्त कोणत्याही धार्मिक जागेची विनंती केली नव्हती,” असेही किर्ती वर्धन सिंह यांनी सांगितले. तसेच यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी)ने असेही स्पष्ट केले की, काही निर्वासित हे आधीच पगडीशिवाय अमेरिकेच्या सीमेवर पोहोचले होते.
नेमकं काय झालं होतं?
डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी दुसर्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी देशातील बेकायदेशीर निर्वासितांबद्दल कठोर भूमिका घेतली होती. अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश केलेल्या शेकडो भारतीयांना तीन वेगवेगळ्या लष्करी विमानातून पंजाबमधील अमृतसर विमानतळावर सोडण्यात आले.
दरम्यान काही निर्वासितांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून त्यांच्याबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांना पगडी काढण्यास सांगण्यात आल्याचे म्हटले होते. तसेच विमानातील महिला निर्वासितांना देखील बेड्या घालण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर विरोधकांनी सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली होती. यानंतर आत या आरोपांना सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.