Arun Yogiraj denied US visa: अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची सूंदर मूर्ती घडविणार कर्नाटकच्या म्हैसूर येथील मूर्तीकार अरुण योगीराज यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला आहे. व्हर्जिनिया येथे तीन दिवसांच्या परिषदेसाठी ते अमेरिकेत जाणार होते. अमेरिकेत बारावी जागतिक कन्नड परिषद ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान संपन्न होणार आहे. या परिषदेसाठी अरुण योगीराज उपस्थित राहणार होते. मात्र त्यांचा व्हिसा नाकारला गेल्यामुळे आता योगीराज यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरुण योगीराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, व्हिसा मिळविण्यासाठी जे कागदपत्रे लागतात, ती सर्व आम्ही पुरविली होती. तरीही व्हिसा का नाकारण्यात आला, याची कोणतीही माहिती सध्या देण्यात आलेली नाही. अरुण योगीराज यांच्या पत्नी विजेता यांनी याआधी अमेरिकेचा दौरा केला आहे. तेव्हा कोणतीही अडचण आली नव्हती, आताच व्हिसा का नाकरला गेला, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचा >> “रामलल्ला बदलले, हे माझे काम नाही..”, मूर्तिकार अरुण योगीराज यांची माहिती, म्हणाले, “मूर्ती तयार झाली त्यावेळेस..”

योगीराज कुटुंबीयांनी सांगितले की, अरुण आणि त्याची पत्नी केवळ या परिषदेसाठी अमेरिकेला जाणार होते. परिषद संपन्न होताच ते भारतात परतणार होते. योगीराज यांनीही व्हिसा नाकारल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले.

दरम्यान जागतिक कन्नड परिषदेने अरुण योगीराज यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. निमंत्रण पत्रिकेत परिषदेने म्हटले की, मूर्ती घडविण्याच्या कामात तुम्ही अनन्यसाधारण असे योगदान दिले आहे. तुमचा कलात्मक दृष्टीकोन या परिषदेला एका उंचीवर घेऊन जाईल. तुमचे कार्य सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्णतेच्या भावनेला जिवंत स्वरुप देते, जे आमच्या परिषदच्या उद्देशाशी जवळीक साधणारे आहे.

कोण आहेत अरुण योगीराज

अरूण योगीराज हे कर्नाटकमधल्या मैसूरचे आहेत. त्यांचं घराणंच मूर्तीकारांचं आहे. कारण गेल्या पाच पिढ्यांपासून त्यांच्या घरात मूर्ती तयार करण्याचं काम होतं. अरुण योगीराज हे फक्त कर्नाटकातच नाहीत तर देशभरातल्या प्रसिद्ध मूर्तीकारांमधले एक प्रतिथयश मूर्तीकार म्हणून त्यांची गणना होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुण योगीराज यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. अरुण यांना मूर्ती साकारण्याचा वारसा आपल्या घरातूनच मिळाला आहे.

अरुण योगीराज यांनी केदारनाथ या ठिकाणी आदी शंकराचार्यांचा १२ फूट उंचीचा पुतळाही साकारला आहे. मैसूर या ठिकाणी स्वामी रामकृष्ण परमहंस यांची मूर्तीही त्यांनी साकारली आहे. मैसूरच्या राजाचा १४ फुटांचा पुतळाही त्यांनी तयार केला आहे. तर मैसूर या ठिकाणीच त्यांच्या हातातून निर्मिलेली हनुमानाची २१ फुटांची मूर्तीही बसवण्यात आली आहे. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा १५ फूट उंचीचा पुतळाही त्यांनी तयार केला आहे. त्यांची ही कला संपूर्ण देशात पोहचली आहे. देशातल्या नामांकित मूर्तीकारांमध्ये आणि शिल्पकारांमध्ये त्यांचा समावेश होतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America denies visa to ayodhya ram lalla sculptor arun yogiraj kvg