आज फैसला
जगातील सर्वात प्रबळ महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावरील व्यक्ती निवडण्यासाठी भारतीय वेळेनुसार मंगळवारी सायंकाळपासून अमेरिकी जनतेने मतदानास सुरुवात केली.  निवडणूकपूर्व मतचाचण्यांत विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार मिट रोम्नी यांच्यात ‘फिफ्टी-फिफ्टी’ असलेल्या या निवडणुकीत मतदार कोणाला व्हाइटहाऊसमध्ये पाठवतात, याचा फैसला बुधवारी मतमोजणीनंतर होईल.
भारत अथवा लोकशाही असणाऱ्या अन्य देशांत सार्वत्रिक निवडणुकीत ज्याप्रमाणे सर्वत्र एकाच वेळी मतदान होते, त्यास अमेरिका अपवाद आहे. अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यांत अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदानासाठी वेगवेगळे वेळापत्रक असते, त्यानुसार न्यू हॅम्पशायर येथे सोमवारी मध्यरात्री मतदानाला सुरुवात झाली. यानंतर मंगळवारी सकाळपासून अमेरिकेच्या अन्य राज्यांत मतदान झाले. या निवडणुकीसाठी १८ कोटी मतदार असून त्यापैकी सुमारे तीन कोटी मतदारांनी यापूर्वीच मतदान केले आहे. परदेशी असणारे सैनिक, नोकरी-व्यवसायानिमित्त आपल्या घरापासून लांब असणारे नागरिक आदींचा त्यात समावेश आहे.
प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत ओबामा आणि रोम्नी यांनी झंझावाती दौरे करून कोणतीही कसूर ठेवली नाही. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ओबामा यांचे पारडे जड होते, मात्र रोम्नी यांनी ओबामांच्या धोरणांवर बोचरी टीका करून प्रचारात आघाडी घेतली. ही लढत अतिशय चुरशीची होणार, असा निष्कर्ष आतापर्यंत झालेल्या सर्व जनमत चाचण्यांनी काढला आहे. सीएनएनसारख्या नावाजलेल्या वाहिनीनेही या उमेदवारांपैकी कोणाची सरशी होईल, हे सांगणे कठीण आहे, असे म्हटले आहे. आज म्हणजे बुधवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर व्हाइट हाऊसमध्ये कोण विराजमान होणार, याचा फैसला होईल.

Story img Loader