मुंबईत २६/११ मध्ये झालेल्या हल्ल्याच्या आधी सतर्कतेचा इशारा देणाऱ्या २६ गुप्तचर सूचना मिळाल्या होत्या, त्यात सीआयएच्या सूचनेचाही समावेश होता. लष्कर-ए-तय्यबा असा हल्ला मुंबईत करणार असल्याबाबतचे हे इशारे फार आधीच देण्यात आले होते, असा गौप्यस्फोट एका पुस्तकात करण्यात आला आहे.
‘द सीज- ६८ अवर्स इनसाइट ताज हॉटेल’ या कॅथी स्कॉट क्लार्क व अँड्रीयन लेव्ही या पत्रकारांनी लिहिलेल्या पुस्तकात चौकशीतील माहितीच्या आधारे असे म्हटले आहे की, एकाचवेळी अनेक ठिकाणी हल्ले होणार असल्याच्या किमान ११ गुप्तचर सूचना मिळाल्या होत्या. त्यातील सहा सूचना या सागरी मार्गाने भारतात प्रथमच हल्ला होणार आहे, असे स्पष्ट करणाऱ्या होत्या. पेंग्विन यूएसए या कंपनीने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे.
अमेरिकी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या कर्मचाऱ्यांना २००७ पासूनच लष्कर ए तय्यबा अशा प्रकारे कारवाया करीत असल्याची माहिती युरोपियनांकडून मिळाले होती पण अमेरिकेने त्याकडे दुर्लक्ष केले असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. २००६ मध्ये मुंबई हल्ल्याबाबत पहिला गुप्तचर इशारा मिळाला होता त्यावेळी लष्कर ए तय्यबा व आयएसआय या दोन संघटनांनी डेव्हीड हेडली याला संबंधित अतिरेक्यांना मुंबईत जाऊन लक्ष्य ठरवण्यास सांगितले होते. त्यामुळे मुंबई हल्ल्याची तयारी २००६ मध्ये सुरू झाली होती हे समजले होते. ट्रायडंट-ओबेरॉय व ताज अशा पंचतारांकित हॉटेल्सची निवड हल्ल्यांसाठी करण्यात आली होती. त्यानंतर किमान २५ धोक्याचे इशारे सीआयएने भारत सरकारच्या गुप्तचर संस्थेला (रॉ-रीसर्च अँड अ‍ॅनलिसीस विंग) दिले होते. रॉ या संस्थेने ही माहिती अंतर्गत गुप्तचर संस्थेलाही दिली होती. मुंबई पोलिसांनी या माहितीची तपासणी करून अमेरिका काही महत्त्वाचा स्रोत शोधते आहे, असे समजून त्याला फार महत्त्व दिले नाही. लष्कर ए तय्यबा या बंदी घातलेल्या संघटनेला त्यावेळी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून अर्थपुरवठा मिळत होता. मुंबईत अनेक दहशतवादी हल्ले झाले होते पण आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर वेगळ्या प्रकारे हल्ला करावा असे पाकिस्तानी गुप्तचरांनी लष्कर-ए-तय्यबाला सांगितले होते. मुंबई हल्ल्याबाबत तीन इशारे हे आत्मघाती हल्ल्याचा विशेष उल्लेख करणारे होते. काश्मीरमध्येही लष्कर-ए-तय्यबाने याच पद्धतीने आत्मघाती हल्ल्यांचे डावपेच लढवल्याचे पुस्तकात म्हटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America has 26 secret information on 26 11 mumbai attack
Show comments