एकीकडे भारतात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे वातावरण तापू लागलेलं असताना अमेरिकेतही अध्यक्षीय निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासमोर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारतीय वंशाचे रिपब्लिक पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांचं आव्हान आहे. मात्र, आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका मुद्द्याचंही आव्हान त्यांच्यासमोर उभं राहिलं आहे. त्यांचे पुत्र हंटर बायडेन यांच्यावर बेकायदा शस्त्रखरेदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या निवडणुकीत त्यांच्या विरोधकांकडून या मुद्द्याचं भांडवल केलं जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतली पहिलीच घटना!

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर आधीच महाभियोग चौकशीची टांगती तलवार आहे. त्यातच आता त्यांच्या मुलावरही गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या राष्ट्राध्यक्षाच्या मुलावर अशा प्रकारे गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही अमेरिकेतली पहिलीच वेळ आहे. याआधी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच गुन्हा दाखल झाल्याचं समोर आलं होतं. त्यापाठोपाठ हंटर बायडेन यांचं प्रकरण समोर आल्यामुळे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

नेमकं झालं काय?

जो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांच्यावर अमेरिकेच्या डेलवेअर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्यावर २०१८च्या ऑक्टोबरमध्ये चुकीची माहिती देऊन शस्त्र मिळवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांनी कोल्टा कोब्रा गन खरेदी केली होती. आपण बेकायदा अंमली पदार्थ घेत असल्याचं त्यांनी शस्त्रविक्रेत्यापासून लपवून शस्त्र मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकारावर आत्ता निवडणुकीच्या काही महिने आधी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा मुद्दाही अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरू लागला आहे.

हंटर बायडेन यांच्या व्यवसायांमुळेही अडचण

दोनच दिवसांपूर्वी अमेरिकी संसदेमध्ये हंटर बायडेन यांच्या विदेशी व्यावसायिक करारांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत थेट जो बायडेन यांच्याविरोधातच महाभियोग आणण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांनी हा अध्यक्षांविरोधातला जाणीवपूर्वक करण्यात आलेला डाव ठरवत तो फेटाळून लावला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America president joe biden son hunter charged with illegal gun purchase pmw