रशियानं युक्रेनवर हल्ला करून एक महिना उलटला आहे. २४ फेब्रुवारी रोजी रशियानं युक्रेनवर हल्ला चढवला होता. अजूनही हे युद्ध सुरूच असून रशिया माघार घ्यायला तयार नाही. एकीकडे रशिया आपला आक्रमक हेका सोडायला तयार नसताना दुसरीकडे युक्रेनच्या बाजूने देखील आता आंतरराष्ट्रीय पाठिंबा तयार होऊ लागला आहे. अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला असून यामध्ये शस्त्रास्त्रांची देखील मदत केली जात आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या महायुद्धाची देखील शक्यता वर्तवली जात असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाला गंभीर इशारा दिला आहे. त्यामुळे आता तरी पुतीन थांबतील का? यावर चर्चा सुरू झाली आहे.
जी-२० मधून रशियाची हकालपट्टी?
जो बायडेन यांनी गुरुवारी नेटो (NATO) सदस्य राष्ट्रांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. या बैठकीच्या निमित्ताने जो बायडेन यांनी रशियावर प्रदीर्घ काळासाठी निर्बंध घातले जाण्याचं समर्थन केलं. तसेच, रशियाला जी-२० राष्ट्रांच्या समूहातून हाकलून लावण्याचा देखील प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सांगितलं. मात्र, त्याहीपुढे जाऊन आता बायडेन यांनी रशियाच्या आक्रमक वृत्तीला प्रत्युत्तर म्हणून निर्वाणीचा इशारा दिला आहे.
गेल्या महिन्याभरापासून युक्रेनला नमवण्यासाठी रशियन फौजा प्रयत्न करताना दिसत असून देखील युक्रेनचा लढा सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर रशियाकडून रासायनिक अस्त्रांचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भातला संभाव्य धोका आणि गंभीर परिणाम लक्षात घेता जो बायडेन यांनी रशियाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. रशियानं रासायनिक अस्त्रांचा वापर केला तर आम्ही युद्धात उतरू, असं बायडेन म्हणाले आहेत.
Ukraine War: रशियासंदर्भातील भारताच्या भूमिकेवर बायडेन नाराज; म्हणाले, “भारताची भूमिका थोडी…”
“जर पुतीन यांनी रासायनिक अस्त्रांचा वापर युक्रेनविरुद्धच्या युद्धात केला, तर आम्ही (नेटो सदस्य राष्ट्रे) युद्धात उतरून त्यांना प्रत्युत्तर देऊ. ज्या पद्धतीने आणि प्रमाणात या अस्त्रांचा वापर होईल, त्याच पद्धतीने आणि प्रमाणात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल”, असा इशारा बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना दिला आहे.
प्रदीर्घ काळासाठी निर्बंध!
दरम्यान, रशियावर प्रदीर्घ काळासाठी निर्बंध लादण्याची भूमिका बायडेन यांनी घेतली आहे. “रशियावर निर्बंध दीर्घ काळासाठी लागू ठेवणं ह वेदनादायी असेल. मी नेटो राष्ट्रांची तातडीची बैठक याचसाठी बोलावली आहे की त्यातून सध्या सुरू असलेले निर्बंध दीर्घकाळ सुरू ठेवता यावेत. फक्त पुढचा महिना किंवा त्यापुढचा महिना नाही तर संपूर्ण वर्षभर”, असं बायडेन यांनी नमूद केलं.