वृत्तसंस्था, पनामा शहर

अमेरिकेने पनामावर छुपे आक्रमण केले आहे असा आरोप तेथील विरोधी पक्षांनी केला आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्या तीन दिवसांच्या पनामा दौऱ्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमचे सैनिक पनामाच्या दिशेने पाठवले आहे असे पत्रकारांना सांगितले. यावरून पनामामध्ये राजकीय मतभेद वाढले आहेत.

ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर, ही छुपी घुसखोरी असल्याची टीका पनामामधील ‘अदर वे मूव्हमेंट’ या विरोधी पक्षाचे नेते रिकार्डो लोम्बाना यांनी केली. बंदुकीची एकही गोळी न झाडता, बडगा दाखवून आणि धमक्या देऊन ही घुसखोरी करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

मात्र, ‘‘चीनच्या प्रभावापासून पनामा कालव्याचे संरक्षण करण्यासाठी आधीच्या तीन तळांवर अमेरिका सैन्य वाढवणार आहोत,’’ असे हेगसेथ यांनी सांगितले.