कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांवरून सध्या जागतिक स्तरावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्याप्रकरणात ट्रुडो यांनी भारताचा सहभाग असल्याचा दावा त्यांच्या संसदेसमोर केला. भारतानं हा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला असून कॅनडामध्ये खलिस्तान समर्थकांना मिळत असणाऱ्या आश्रयावर तीव्र आक्षेप नोंदवला. यावर अमेरिकेनं कॅनडाची बाजू घेतली असताना अमेरिकेच्याच माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं आपल्याच देशाला घरचा आहेर दिला आहे!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भारतानं तपासात सहकार्य करावं”

हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणी जस्टिन ट्रुडो यांनी केलेले आरोप गंभीर असून भारतानं या तपासात कॅनडाच्या तपास यंत्रणांना सहकार्य करावं, अशी भूमिका अमेरिकेकडून घेण्यात आली आहे. तसेच, देश कोणताही असला तरी न्यायाच्या व सार्वभौमत्वाच्या तत्वाशी तडजोड करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका अमेरिकेनं घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक व माजी उच्चपदस्थ अधिकारी मायकेल रुबिन यांनी अमेरिकन सरकारला घरचा आहेर दिला आहे.

काय म्हणाले रुबिन?

रुबिन यांनी अमेरिकन सरकारला लादेन प्रकरणाची आठवण करून दिली आहे. “आपण स्वत:चीच फसवणूक करण्यात काहीही अर्थ नाही. हरदीप सिंग निज्जर काही फक्त एक प्लंबर नव्हता. तसं म्हटलं तर ओसामा बिन लादेन एक बांधकाम अभियंता होता. निज्जरनं केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठा रक्तपात झाला होता”, असं रुबिन म्हणाले.

Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”!

“कदाचित सचिव ब्लिंकन कॅनडाच्या आरोपांबाबत असं म्हणू शकतात की अमेरिका इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर राखण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. पण तसं करताना आपण खरंतर दुतोंडी भूमिका घेत आहोत. कारण इथे आपण दोन देशांच्या सार्वभौमत्वाबाबत बोलत नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या दहशतवादाबाबत बोल आहेत. अमेरिकेनं कासिम सुलेमानी व ओसामा बिन लादेनबाबत जे केलं, तेच भारतानंही हरदीप सिंग निज्जरच्या बाबतीत केल्याचा दावा केला जात आहे”, असं मायकेल रुबिन यावेळी म्हणाले.

“ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”

दरम्यान, जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केल्याची प्रतिक्रिया रुबिन यांनी दिली आहे. “पंतप्रधान ट्रुडोंनी फार मोठी चूक केली आहे. त्यांनी भारतावर केलेल्या आरोपांचे पुरावे त्यांना अद्याप सादर करता आलेले नाहीत. एक तर ते हवेत गोळीबार करतायत किंवा या प्रकरणात खरंच तथ्य असेल. पण काहीही असलं तरी जस्टिन ट्रुडो यांना हे सांगावंच लागेल की त्यांनी रक्तपात केलेल्या एका दहशतवाद्याला कॅनडामध्ये आश्रय का दिला होता”, असं रुबिन यावेळी म्हणाले.

“या सगळ्या वादामध्ये मोठा धोका भारतापेक्षा कॅनडालाच जास्त आहे. जर कॅनडानं भारताशी वाद ओढवून घेतलाच, तर या घडीला हे एखाद्या मुंगीनं हत्तीशी वैर करण्यासारखं होईल. कारण सत्य हे आहे की भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. जागतिक स्तरावर भारत धोरणात्मकदृष्ट्या कॅनडापेक्षा खूप जास्त महत्त्वाचा आहे. विशेषत: चीनचं आव्हान व दक्षिण आशियातील इतर समस्यांचा विचार करता भारत महत्त्वाचा आहे”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America stand on canada prime minister justin trudeau allegations on india michael rubin pmw