खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा आरोप कॅनडानं भारतावर केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. यासंदर्भात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आधी देशाच्या संसदेत हे आरोप केल्यानंतर आता भारताशी असणारे द्विपक्षीय संबंध कॅनडासाठी महत्त्वाचे असल्याची नरमाईची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने कॅनडाची बाजू घेत भारतानं तपासात सहकार्य करायला हवं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नुकतीच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात बोलताना अमेरिकेच्या गृहविभागाच्या प्रवक्त्यांनी भूमिका मांडली आहे.
कॅनडामध्ये नेमकं काय घडलं?
१८ जून रोजी व्हँकोव्हरमध्ये हरदीप सिंग निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यात भारताचा सहभाग असल्याचा आरोप जस्टिन ट्रुडो यांनी केला. दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. भारतानं कॅनडातील व्हिसा केंद्र तात्पुरतं बंद केलं. नुकतंच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भाष्य करताना कॅनडानं त्यांच्या आरोपांना बळ देतील असे कोणतेही पुरावे भारताला दिले नसल्याची ठाम भूमिका मांडली. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचा अमेरिका दौरा महत्त्वाचा मानला जात होता.
अमेरिकेनं सुरुवातीपासूनच कॅनडाची बाजू घेतली आहे. कॅनडाचे आरोप गंभीर असून भारतानं या तपासात कॅनडाला सहकार्य करायला हवं, अशी अपेक्षा अमेरिकेच्या अनेक उच्चपदस्थ अधिकारी व संसद सदस्यांनी जाहीरपणे घेतली आहे. या पार्श्वभूमीवर एस. जयशंकर यांची कॅनडाचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी भेट या वादासंदर्भात नव्या घडामोडींना चालना देणारी ठरेल, असं बोललं जात होतं.
पाकिस्तानने रचला खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा कट? समोर आली महत्त्वाची माहिती
काय घडलं दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत?
दरम्यान, ही बैठक पार पडल्यानंतर अमेरिकेच्या गृहविभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. “जोपर्यंत उच्चपदस्थ अधिकारी वा मंत्री यांच्यात झालेल्या चर्चेसंदर्भात ते स्वत: माहिती देत नाहीत, तोपर्यंत मी त्यावर काहीही बोलायचं नाही असं ठरवलंय”, असं मिलर म्हणाले. “पण आम्ही सातत्याने भारताला या तपासात पूर्ण सहकार्य करण्याची विनंती करत आहोत आणि ती आमची विनंती कायम राहणार आहे”, असंही मिलर यांनी स्पष्ट केलं.
अमेरिकेच्या विनंतीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर किंवा भारत सरकार यांनी नेमकी काय भूमिका मांडली? असा प्रश्न विचारला असता मात्र मिलर यांनी काहीही संगण्यास नकार दिला. “ते स्वत:साठी बोलू शकतात. मी त्यावर काहीही बोलणार नाही. त्यांच्या राजनैतिक बैठकांमध्ये काय चर्चा झाली, हे मी सांगणार नाही. मी स्वत:बद्दल किंवा आमच्या मूलभूत भूमिकेबद्दल बोलेन”, असं मिलर म्हणाले.