America Travel Advisory : गेल्या काही दिवसांपासून भारतातील जम्मू-काश्मीर, मणिपूरसह अजून काही भागात दहशतवादी हल्ल्याच्या आणि हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत असल्याचं समोर येत आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना अमेरिकेनं सतर्कतेचा इशारा देत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतातील दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी केली आहे.
यानुसार भारतातील मणिपूर, जम्मू-काश्मीर आणि भारत-पाकिस्तान सीमा भागामध्ये न जाण्याचा सल्ला अमेरिकेनं दिला आहे. तसेच नक्षलवादी सक्रिय असलेल्या भागातही न जाण्यास सांगण्यात आले आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या सूचना जारी केल्या आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, ईशान्येकडील राज्यांच्या माहितीसह अद्यतनित करण्यात आले आहे. गुन्हेगारी, दहशतवाद आणि नक्षलवादामुळे भारतात अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. यासोबतच काही भागात मोठ्या प्रमाणात धोका वाढल्याचंही सांगण्यात आलं आहे.
अमेरिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनामध्ये म्हटलं की, भारताच्या काही भागात धोका वाढला आहे. एकूणच, भारताला लेव्हल-२ वर ठेवण्यात आले असून देशाच्या अनेक भागांना लेव्हल-४ वर ठेवण्यात आले आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर, भारत-पाकिस्तान सीमा, मणिपूर आणि मध्य आणि पूर्व भारताचा काही भाग समाविष्ट आहे. दरम्यान, या संदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.
अधिकाऱ्यांच्या मते पर्यटन स्थळांवर हिंसक गुन्हे घडले आहेत. दहशतवादी कधीही हल्ला करू शकतात, ते मॉल्स, पर्यटन स्थळे, बाजारपेठा आणि सरकारी आस्थापनांना लक्ष्य करु शकतात. दरम्यान, भारतासंदर्भातील सल्ल्यामध्ये म्हटलं की, अमेरिकन सरकारकडे ग्रामीण भागामध्ये अमेरिकन नागरिकांना आपत्कालीन सेवा प्रदान करण्यासाठीची क्षमता मर्यादित आहे. हे क्षेत्र पूर्व महाराष्ट्र आणि उत्तर तेलंगणापासून पश्चिम बंगालपर्यंत पसरलेले आहेत.
या राज्यांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला
अमेरिकेने जारी केलेल्या सूचनामध्ये म्हटलं की, मणिपूर आणि जम्मू-काश्मीरला प्रवास करु नका. नक्षलवाद, दहशतवाद आणि नागरी अशांततेमुळे जम्मू आणि काश्मीर प्रदेशात सशस्त्र संघर्षाचा धोका आहे. दहशतवाद आणि नागरी अशांततेमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये (पूर्व लडाख आणि लेह वगळता) प्रवास करू नका, असं म्हटलं आहे. सशस्त्र संघर्षाच्या शक्यतेमुळे भारत आणि पाकिस्तान सीमेच्या १० किमीच्या परिसरात जाऊ नका. तसेच याव्यतिरिक्त अमेरिकन लोकांना हिंसाचारामुळे ईशान्य राज्यांच्या प्रवासावर पुनर्विचार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.