अमेरिकेने एका शीख फुटीरतावाद्याची न्यूयॉर्कमध्ये हत्या करण्याचा कट रचल्यावरून भारतीय सरकारी अधिकाऱ्याकडे बोट दाखवलं. यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली. अमेरिकेने केलेला आरोप ही ‘चिंतेची बाब’ असल्याचे मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटलं. यानंतर आता अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी अमेरिका-भारत संबंधावर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी अमेरिका या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहे, असंही नमूद केलं.
जॉन किर्बी म्हणाले, “भारत अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार आहे. आम्ही यापुढेही भारताबरोबरचे धोरणात्मक भागीदारी सुधारण्यासाठी आणि अधिक मजबूत करण्यासाठी काम करत राहू. याचवेळी हत्येच्या कटाच्या प्रकरणाला आम्ही गांभीर्याने घेतलं आहे.या आरोपांना आणि या तपासाला आम्ही खूप गांभीर्याने घेतलं आहे.”
“भारतानेही हे प्रकरण गांभीर्याने घेत तपासासाठी स्वतः प्रयत्न सुरू केले आहेत हे पाहून आम्ही समाधानी आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे की, या गुन्ह्यात जे दोषी आहेत त्यांची जबाबदारी निश्चित व्हायला हवी,” असंही किर्बी यांनी नमूद केलं.
नेमकं प्रकरण काय?
अमेरिका व कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व असल्याचे सांगणारा शीख फुटीरतावादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येच्या फसलेल्या कटासंदर्भात अमेरिकेतील न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. निखिल गुप्ता नामक व्यक्तीवर कटाचा आरोप ठेवण्यात आला असून एका भारतीय सरकारी अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून त्याने हा कट रचल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.
हत्येच्या कटाच्या आरोपावर भारताची प्रतिक्रिया
याबाबत गुरूवारी बागची यांना विचारले असता आरोपांचा तपास करण्यासाठी भारताने एक तपास पथक स्थापन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘एका भारतीय व्यक्तीवरील आरोप व त्याचा भारतीय अधिकाऱ्याशी संबंध जोडला जाणे ही चिंतेची बाब आहे. मात्र हे सरकारच्या धोरणाविरुद्ध असल्याचे आम्ही पूर्वीही सांगितले असून मी त्याचा पुनरुच्चार करू इच्छितो’, असे बागची पत्रकार परिषदेत म्हणाले. संघटित गुन्हे, मानवी तस्करी, शस्त्रांची चोरटी आयात आणि अतिरेकी यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील परस्पर संबंध हा यंत्रणांसाठी कायम विचारात घेण्याचा गंभीर मुद्दा राहिल्याचे त्यांनी नमूद केले. अमेरिकेने या संबंधात काही माहिती सोपवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.