पीटीआय, न्यूयॉर्क
अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ने (डीओजीई) भारताला दिली जाणारी २.१० कोटी डॉलर मदत बंद करण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. भारतातील निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला होता. ‘डीओजीई’ने शनिवारी लिहिलेल्या पोस्टनुसार, वेगवेगळ्या योजनांसाठी अमेरिकेकडून दिला जाणारा एकूण ४८.६ कोटी डॉलरचा निधी थांबवण्यात आला आहे.
अमेरिकी करदात्यांचा पैसा पुढील बाबींवर खर्च होणार होता, तो सर्व आता थांबवला आहे असे डीओजीईने म्हटले आहे. त्यामध्ये मतदानाचे प्रमाणा वाढवण्यासाठी ‘कन्सोर्टियम फॉर इलेक्शन्स अँड पॉलिटिकल प्रोसेस स्ट्रेन्ग्थनिंग’ या भारतातील उपक्रमाचा आणि मोल्दोवामधील सर्वसमावेशक आणि सहभाग वाढवणाऱ्या राजकीय प्रक्रियाविषयक उपक्रमाचा समावेश आहे. या पोस्टमध्ये अन्य तपशीलांची माहिती दिलेली नाही.
दरम्यान, अमेरिकेने हा निधी देणे हा भारताच्या निवडणूक प्रक्रियेत परकीय हस्तक्षेप असल्याचा दावा भाजपचे नेते आणि आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी केला. या निधीचा फायदा भाजपला झाला नव्हता असे म्हणत कोणाला या निधीचा लाभ झाला होता असा प्रश्न त्यांनी विचारला.
पंतप्रधानांबरोबर भेटीनंतर घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना डीओजीईचे प्रमुक इलॉन मस्क यांनी सहकुटुंब त्यांची भेट घेतली होती. या भेटीच्या वेळी भारताच्या शिष्टमंडळातील इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्या भेटीमध्ये मोदी आणि मस्क यांनी अवकाश, तंत्रज्ञान व ऊर्जा या क्षेत्रांसंबंधी चर्चा केली होती.