व्हाइट हाऊस प्रकरणात अमेरिकेतील न्यायालयाचा निर्णय
वॉशिंग्टन : अमेरिकेतील सीएनएन या वृत्तवाहिनीचे वार्ताहर जिम अकोस्टा यांच्यावर व्हाइट हाऊसने जारी केलेली बंदी अमेरिकेच्या न्यायालयाने तात्पुरती उठवली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत ही बंदी उठवली जाईल.
सीएनएनचे वार्ताहर जिम अकोस्टा यांचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वाद झाल्याने त्यांना व्हाइट हाऊसमध्ये प्रवेशास बंदी घालण्यात आली होती. व्हाइट हाऊसमध्ये ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प आणि अकोस्टा यांच्यात मायक्रोफोन वापरण्यावरून वाद झाला. अकोस्टा ट्रम्प यांना वारंवार प्रश्न विचारत राहिले. त्यावर ट्रम्प यांनी अकोस्टा यांचा रूड, टेरिबल पर्सन असा उल्लेख केला आणि त्यांचा व्हाइट हाऊसमध्ये प्रवेशाचा परवाना रद्द करण्यात आला.
ट्रम्प प्रशासनाकडून प्रसारमाध्यमांची गळचेपी केली जात असल्याच्या प्रश्नावरून वादंग माजले. हे प्रकरण न्यायालयात गेले. अकोस्टा यांचा परवाना रद्द करणे म्हणजे प्रसारमाध्यमांच्या घटनादत्त अधिकारांचे उल्लंघन आहे, असा प्रसारमाध्यमांनी दावा केला. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायाधीश टिमोथी केली यांनी प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत व्हाइट हाऊसच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि अकोस्टा यांच्यावरील बंदी तात्पुरती उठवली.