अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट लिहून आपले वडील अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची बातमी दिली. या पोस्टनंतर अमेरिकेसह जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये खळबळ उडाली. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचं समोर आलं आहे.
खरं तर, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांचं अधिकृत ‘एक्स’ अकाऊंट (ट्विटर) बुधवारी हॅक झालं. त्यावरून अनेक पोस्ट करण्यात आल्या. यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची खोटी घोषणाही करण्यात आली. तसेच आणखी एका पोस्टमध्ये अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाही लक्ष्य केलं.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, २० सप्टेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका पोस्टला १ लाख ४० हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले. संबंधित पोस्टमध्ये लिहिलं की, “मला जाहीर करताना अत्यंत दुःख होत आहे. माझे वडील डोनाल्ड ट्रम्प यांचं निधन झालं आहे. त्यामुळे २०२४ मध्ये मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे.”
डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांचं ‘एक्स’ खातं हॅक झाल्याची खात्री काही नेटकऱ्यांकडून केली. पण ट्रम्प यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे अनेक नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. हॅकिंगच्या या घटनेनंतर मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.