शनिवारी नेपाळमध्ये झालेल्या ७.९ रिश्टरच्या भूकंपामुळे भारतातील खडकांच्या थराचा (प्लेट्स) एक फूट ते १० फूट भाग काही सेकंदात उत्तरेकडे नेपाळच्या खाली सरकला आहे, असे अमेरिकी भूगर्भ शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
कोलम्बिया विद्यापीठाच्या ‘लॅमॉँट डोरथी अर्थ ऑब्झर्वेटरी’चे संशोधक प्रा. कोलिन स्टार्क यांनी सांगितले की, शनिवारी भारताचा १००० ते २००० चौरस मैल भाग एका दिशेने सरकला आहे. हा भाग साधारण काठमांडू व पोखरा शहरांदरम्यानच्या भागाइतका आहे, किंबहुना तो एखाद्या लहान हिमालयीन पर्वताच्या रुंदीइतका आहे.
भारताचा १ ते दहा फूट इतका भाग काही सेकंदात नेपाळच्या खाली सरकला आहे. बिहारच्या खालचा खडकांचा थर म्हणजे क्रस्ट भरतपूर येथून हेताउदा मार्गे नेपाळच्या जनकपूरकडे सरकला आहे. पूर्ण उत्तर भारताचा भूस्तर हा नेपाळच्या खाली उत्तरेकडे सरकत आहे. वेगवेगळ्या पट्टय़ात वेगवेगळ्या वेळी ही क्रिया घडून आलेली आहे, असे स्टार्क यांचे मत आहे.
भूगर्भशास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या प्लेट्सच्या हालचाली अभ्यासल्या असून पृथ्वीच्या प्लेट्स म्हणजे भूस्तर किती वेगाने हालचाली करतात याचा त्यात समावेश आहे. संपूर्ण भारतीय उपखंडच हळूहळू सरकत असून तो नेपाळ व तिबेटच्या खाली दर वर्षी १.८ इंच या वेगाने जात आहे, असे स्टार्क यांनी म्हटले आहे.
गेल्या कोटय़वधी वर्षांत हिमालय पर्वत कॉनसेर्टिना वाद्यासारखा पिळला गेला असून पर्वतांची उंची काही मैलांनी वाढली आहे, त्यामुळे पाकिस्तान ते म्यानमार या पट्टय़ात भूकंप होत आहेत. शनिवारचा भूकंप हा असामान्य किंवा अनपेक्षित नव्हता तर तो मोठा होता एवढे मात्र खरे, असे सांगून स्टार्क म्हणतात की, गेल्या ८१ वर्षांत १९३४ मध्ये बिहारमध्ये भूकंपात १० हजार लोक मरण पावले होते व त्यावेळी भारताचा १२ फूट भूभाग नेपाळकडे ढकलला गेला होता. या सर्व हालचालींचा विचार करता नेपाळमध्ये भूगर्भात किती दाब असेल हे लक्षात यायला हरकत नाही , तो दाब भूस्तरांच्या प्रस्तरभंग पटलांवर येत आहे. काहीवेळा भूगर्भात दडलेली ऊर्जा व त्यामुळे भूपृष्ठावर येणारा दाब (स्प्रिंग) एवढा मोठा असतो की, त्यामुळे फार मोठय़ा भागांत हानी होऊ शकते. जेवढा भाग नेपाळच्या खाली जाईल तेवढी नेपाळच्या भूगर्भात दडपत चाललेली ऊर्जा वाढत जाईल व मोठे नुकसान होईल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
भारताच्या भूस्तराचा काही भाग नेपाळच्या दिशेने सरकला..
शनिवारी नेपाळमध्ये झालेल्या ७.९ रिश्टरच्या भूकंपामुळे भारतातील खडकांच्या थराचा (प्लेट्स) एक फूट ते १० फूट भाग काही सेकंदात उत्तरेकडे नेपाळच्या खाली सरकला आहे, असे अमेरिकी भूगर्भ शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-04-2015 at 01:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American geologist says some of india portion moves towards nepal