Parenting In India: सुमारे चारवर्षांपूर्वी भारतात स्थलांतरित झालेल्या एका अमेरिकन महिलेने तिचा भारताबद्दलचा अनुभव इन्स्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने भारत तिच्या लहान मुलांच्या संगोपनासाठी कसा सर्वोत्तम आहे, याबद्दल सांगितले आहे. तीन मुलांची आई असलेल्या क्रिस्टन फिशर यांनी इंस्टाग्रामवर त्यांच्या या पोस्टबरोबर एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा मुलागा हातात एक शितपेय घेऊन रस्त्यावरून चालताना दिसत आहे.

“भारतात लहानाचे मोठे होण्याचा माझ्या मुलांना खूप फायदा होईल. अमेरिकेऐवजी भारतात त्यांचे बालपण कसे सर्वोत्तम आहे, याबबात मी सांगणार आहे”, असे या महिलेने पोस्टच्या सुरुवातीला म्हटले आहे.

यानंतर क्रिस्टन फिशर यांनी भारतातील सांस्कृतिक जागरूकता, बहुभाषिकता, भावनिक बुद्धिमत्ता आणि भक्कम कौटुंबिक बंध यावर भाष्य केले आहे.

सांस्कृतिक जागरूकता

सांस्कृतिक जागरूकतेबाबत बोलतना त्या म्हणाल्या की, “भारतात राहिल्याने माझ्या मुलांना संस्कृती, भाषा आणि चालीरीतींच्या समृद्ध विविधतेची ओळख होईल. यामुळे त्यांना वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल समज निर्माण होण्यास मदत होईल. याचबरोबर ज्यामुळे मोकळेपणा आणि अनुकूलता निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळते.”

बहुभाषिकता

“भारतात अनेक भाषा आणि बोलीभाषा आहेत. माझी मुले हिंदी आणि इंग्रजीसोबतच इतर अनेक भाषा शिकतील. बहुभाषिकतेमुळे संज्ञानात्मक विकास होतो, संवाद कौशल्ये सुधारतात आणि भविष्यातील नोकरीच्या संधी वाढतात”, असे फिशर यांनी बहुभाषिकतेबाबतचे मत व्यक्त केले आहे.

भावनिक बुद्धिमत्ता

“भारतातील विविध सामाजिक नियम आणि कौटुंबिक रचनांशी संपर्क आल्यामुळे माझ्या मुलांमध्ये उच्च भावनिक बुद्धिमत्ता विकसित होण्यास मदत होईल. ते विविध लोकांशी संवाद साधण्यास आणि विविध भावनिक संकेत समजून घेण्यास शिकतील. यामुळे त्यांची सहानुभूती आणि सामाजिक कौशल्ये सुधारतील”, भावनिक बुद्धिमत्तेबाबत त्यांनी हे मत मांडले आहे.

भक्कम कौटुंबिक बंध

भारतातील भक्कम कौटुंबिक संबंधांबाबत आपल्या पोस्टमध्ये फिशर म्हणाल्या की, “अनेक भारतीय कुटुंबांमध्ये, जवळचे नातेसंबंध आणि एकत्रित कुटुंब पद्धतीवर भर दिला जातो. यामुळे माझ्या मुलांना आपलेपणाची भावना, भावनिक आधार मिळेल. हे अमेरिकन विभक्त कुटुंब पद्धतीपेक्षा खूप वेगळे आहे.”

फिशर यांची भारताबाबतची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर अनेक युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्या या दृष्टिकोनाचे कौतुक केले, तर काहींनी वेगवेगळे मत व्यक्त केले आहे.